नेतृत्व, वक्तृत्व अन् कर्तुत्वाचा संगम: ॲड. जयश्रीताई शेळके

 
BIRTHDAY SPECIAL जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुरुषप्रधान चित्र असले तरी कर्तबगार व क्षमतावन महिलाही कार्यरत आहे. काँग्रेसच्या प्रदेश सचिव ऍड.जयश्री शेळके या त्यात अग्रभागी आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे जयश्री शेळके! जयश्रीताई आजघडीला लोकप्रतिनिधी नसल्या कोणत्याही कामासाठी हक्काने ताईंना फोन करणारी लाखो माणसं आहेत, कारण लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे! आज जयश्रीताईंचा वाढदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा..!
 

जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुरुषप्रधान चित्र असले तरी कर्तबगार व क्षमतावन महिलाही कार्यरत आहे. काँग्रेसच्या प्रदेश सचिव ऍड जयश्री शेळके या त्यात अग्रभागी आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे जयश्री शेळके होय. राजकारणाचा वारसा लाभल्याने त्या राजकीय क्षेत्रात तळपत आहे. त्यांची क्षमता लक्षात घेऊन त्यांना प्रदेश काँग्रेस मध्ये देण्यात आलेले सचिव पद आणि त्यांनी साखळी (तालुका बुलढाणा) जिल्हा परिषद मतदारसंघात मिळविलेला सहज विजय आणि मतदारसंघाचा कायापालट त्यांचे  कर्तृत्व सिद्ध करणारे ठरले. काँग्रेसच्या विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग लक्षणीय ठरला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बहुचर्चित 'भारत जोडो' त्यांनी घेतलेला कल्पक सहभाग नेत्यांच्या कौतुकास पात्र ठरला. याचबरोबर सहकार, समाजकारण व बचत गट चळवळीत त्यांनी भरीव कार्य केले आहे. शाहू परिवाराच्या माध्यमाने त्यांनी राबविलेल्या योजना, उपक्रम सामान्य घटकांसाठी उपयुक्त ठरले. गुणवत्ता, संघर्ष  आणि मेहनतीच्या जोरावर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील कर्तृत्ववान महिलांमध्ये त्या आघाडीवर आहेत.  समाजकारण, राजकारण, सहकार, बचतगट, महिला सक्षमीकरण, कृषी, विधी, उद्योग  आदी  विविध क्षेत्रात त्यांचा चौफेर वावर आहे.  मुत्सद्दी राजकारणी, उत्कृष्ट वक्ता, कुशल संघटक, संवेदनशील मनाच्या सामाजिक कार्यकर्त्या, प्रतिभासंपन्न लोकनेत्या म्हणून जयश्रीताई शेळके यांची ओळख आहे. 

jayshree shelke

राजकारण, समाजकारणाचा वारसा..

जयश्रीताई शेळके यांना माहेरकडून राजकारण, समाजकारणाचा भक्कम वारसा लाभला आहे. चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे हे त्यांचे जन्मगाव. वडील उत्तमराव पाटील सैन्यात असल्याने बालपणापासून त्यांच्यावर  शिस्तीचे संस्कार झाले. जयश्रीताईंनी पुणे विद्यापीठातुन एम. ए. (इंग्रजी) तर अमरावती विद्यापीठातून एल.एल.बी. ची पदवी घेतली  आहे. त्यांचे आजोबा दिवंगत स्वातंत्र्यसेनानी उत्तमराव पाटील हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. चिखली तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष पद त्यांनी तब्बल १५ वर्षे भूषविले होते. त्यामुळे जयश्रीताईंना घरातच राजकारण, समाजकारणाचे बाळकडू मिळाले.  बुलडाणा तालुक्यातील शिरपूर हे त्यांचे सासर आहे. सासरकडून त्यांना सहकाराचा वारसा लाभला आहे. सासरे भाऊसाहेब शेळके यांनी २००२ मध्ये  राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप- क्रेडिट सोसायटीचा राज्य व राज्याबाहेर विस्तार झाला आहे. ग्रीन ऍग्रो बाजार कंपनी ही करार पद्धतीने अंडी उत्पादन करणारी देशातील पहिली कंपनी ठरली. 

बचत गटांना 'दिशा'

दिशा महिला अर्बन क्रेडिट सोसायटीच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. संस्थेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करून आर्थिक पाठबळ देण्यासाठी संस्था प्रयत्नरत आहे. संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांच्या मार्गदर्शनात दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनने अल्पावधीत आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला. फेडरेशनसोबत सध्या १ हजार बचतगट संलग्न आहेत. आगामी काळात  मोताळा तालुक्यासह जिल्हात बचत गटांचे जाळे पसरवण्याचा जयश्रीताईंचा संकल्प आहे. ग्रामपातळीवर नवीन बचत गट स्थापन करणे, बंद  गटांचे पुनरुज्जीवन, बचत गट  प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगासाठी तांत्रिक मार्गदर्शन,  भांडवल उभारणे, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करण्याचे कार्य  फेडरेशनच्या माध्यमातून चालते.  बचतगटांच्या उत्पादनास जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात बाजारपेठ मिळवून देण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे.

जिल्हा परिषदेतही प्रभावी कामगिरी..

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जयश्रीताईंनी मतदारसंघात विकासकामांचा झंझावात निर्माण केला. शिरपूर पाणीपुरवठा योजना,  देवपूर पाझर तलाव, शिरपूर- साखळी रस्ता काम, अटकळ गावासाठी सुरु केलेली एसटी बससेवा, अंगणवाडी बांधकामे, शेतरस्त्यांची कामे, वाचनालय, व्यायामशाळा अशी त्यांच्या विकासकामांची अनेक उदाहरणे देता येतील.

सामाजिक चळवळीतही अग्रेसर...

सामाजिक चळवळीतही जयश्रीताई शेळके यांचे उल्लेखनीय योगदान आहे. राजकारणातही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.  सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र शासकीय कार्यालयात असावे यासाठी त्यांनी २००३ मध्ये आंदोलन केले. २००४ मध्ये सावित्री- जिजाऊ दशरात्रोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ महोत्सवात त्यांचा सहभाग राहिला आहे.. २००६ मध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. २००७ मध्ये त्यांनी राज्यातील ८ हजार महिलांचे तुळजापूर येथे  अधिवेशन भरविले. जमात-ए- इस्लाम- ए- हिंद द्वारा आयोजित 'महंमद सर्वांसाठी' या अभियानात सहभाग,  कुपोषणमुक्ती अभियान व आरोग्य तपासणी अभियानाचे यशस्वी आयोजन, जेएनएलआयद्वारा आयोजित कारले, रायगड येथील शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.

वक्तृत्वाच्या धनी..

राजकारणात अचूक  संभाषणकला आवश्यक ठरते. जयश्रीताई याबाबत खूप श्रीमंत आहेत. कोणत्याही विषयावर बोलतांना त्यांना कधी हातात कागद घेण्याची गरज पडत नाही. राजकीय सभा असो की सामाजिक, शैक्षणिक विचारपीठ. ताई समोरच्यांची मने जिंकतात.   'आजच्या महिलांची दशा आणि दिशा' विषयावरील भाषणाची त्यांची सीडी प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यांत त्यांनी विविध विषयांवर १५०० पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रावरून त्यांची मुलाखत प्रसारित झालेली आहे।कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८ प्रचारात त्यांचा सहभाग होता. 

भूमिपुत्र अभियान..

शासकीय कार्यालयातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी जयश्रीताईंच्या संकल्पनेतुन भूमिपुत्र अभियानाची सुरुवात करण्यात आली. हे अभियान  जनता आणि प्रशासन यांच्यातील दुवा साधणारे अभियान आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. एवढे करूनही आवश्यक ती कागदपत्रे वेळेवर मिळतील याची शाश्वती नसते. नागरिकांची नेमकी हीच अडचण विचारात घेऊन त्यांनी  भूमिपुत्र अभियानाची संकल्पना मांडली. अभियानात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना, जमिनविषयक, रेशनकार्ड तसेच इतर शासकीय योजनांसबंधी प्राप्त तक्रारी जागेवरच मार्गी लावण्यात येतात. उर्वरीत कामांचा पाठपुरावा करुन समस्या सोडवली जाते. 

कोरोनाकाळातील सेवाकार्याचा दिशा पॅटर्न..

कोरोनाकाळात अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने त्यांच्या संकल्पनेतून 'दिशा हेल्पलाईन' सुरु करण्यात आली.  नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्यात आली. कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणे, प्रवाशांना त्यांच्या गावी पोहचवणे, औषधोपचारासाठी मदत, रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाचे डबे पोहचवणे, कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष, अन्नधान्य कीटचे वाटप, अन्नछत्र, मास्क, सॅनिटायझरचे वाटप, रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. सेवाकार्याचा हा 'दिशा पॅटर्न' समाजासाठी दिशादर्शक ठरला .