रोखठोक..! भावना बोथटल्यात नेत्यांच्या! एरवी उठ सुट सोशल मीडियाचा कोणत्याही पोस्ट टाकतील ; पण "राधिकाची हत्या" नेत्यांच्या हृदयाला पाझर फोडू शकली नाही! कारण... राधिका त्यांच्या मतदारसंघातील नव्हती..

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राधिका... उणे पुरे ६ वर्षांचे वय.. जगणं काय असतं हे तिला माहिती नसेल, अर्थात ते तिचं वयही नाही.. कोण आपलं.. कोण परक या भावना देखील त्या बालवयामध्ये नसतात... निरागसता यालाच म्हणावं का?  मग  मारेकऱ्याला राधिका मधली निरागस दिसली नसेल?  समाजमनाच्या तीव्र मात्र नेत्यांच्या बोथट झालेल्या संवेदना राधिकाच्या मृत्यू प्रकरणांत दिसून आल्या आहेत..काळ कुणासाठी थांबत नाही पण हा काळ नक्कीच उलट्या काळजाचा म्हणावा लागेल...! एरवी साधा कुठलाही कार्यक्रम असला की त्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकायला नेते विसरत नाहीत, अनेकदा तर सांत्वन भेटीचाही इव्हेंट होतो..मात्र एकीकडे राधिकाच्या हत्येने जिल्ह्यातील हजारो माय माऊल्या आणि लेकिंच्या बापांचे हृदय पिळवटून निघालेले असतांना जिल्ह्यातील नेत्यांच्या संवेदना एवढ्या बोथट का झाल्यात?  असा प्रश्न उपस्थित होतोय..
 

६ वर्षीय राधिका घटनेच्या दिवशी लग्नासाठी रोहडा येथील तपोवन देवी मंदिर परिसरात पोहचली. काही मिनिटांत ती गायब झाली..पोटचा गोळा हरवल्यानंतर तिच्या आईने केलेला आक्रोश तिथे उपस्थित अनेकांच्या हृदयाला पाझर फोडून गेला. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले, शोध सुरू झाला, मात्र राधिका सापडली नाही. दुसऱ्या दिवशी राधिकाचा थेट मृतदेह आढळला, रुमालाने गळा आवळून तिचा खून करण्यात आला, कबर रचावी तशी  बिचाऱ्या राधिकाच्या अंगावर दगडाच्या काळजाच्या त्या नराधमाने दगडांची पाळ रचली..घटनेला आज ४ दिवस झालेत, पोलीस यंत्रणा सगळ्या शक्यता ध्यानात घेऊन तपास करीत आहेत..पोलीस अधिकारी तहान भूक विसरून तपासात व्यग्र आहेत, काही अधिकारी ४ दिवसांपासून घरी गेले नाहीत, कारण राधिका आपल्या लेकीसमान आहे असं कर्तव्यकठोर असणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील वाटतय..मात्र या सगळ्या घटनाक्रमात  मोजका अपवाद वगळता राजकीय नेते, लोकप्रतिनिधी दिसले नाहीत.. "हेतू साध्य" करण्यासाठी अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन नेते कितीदा देतात..मात्र राधिकाच्या हत्येनंतर साधा शोक देखील त्यांना व्यक्त करावा वाटला नाही..याआधी घडलेल्या अशा घटनांनी देश पेटून उठल्याचे आपण अनुभवले आहे, कारण दिल्लीतली निर्भया असो की आताची राधिका दोघींचा जीव समान आहे ना..या प्रकरणात देखील सामान्य जनतेच्या भावना तीव्र आहेत.. घटना उघडकीस असल्यापासून  "बुलडाणा लाइव्ह" ला शेकडो फोन आलेत..तपास लागला का? नराधमाला फाशी दिली पाहिजे, माझ्यासमोर आला तर आधी फटके देईल अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्यात..मात्र नेत्यांच्या बोथट झालेल्या संवेदना कुणालाही खटकण्यासारख्याच आहेत..राधिका अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील होती, तिचा मतदारसंघ जिल्ह्याबाहेरचा..कदाचित ती जिल्ह्यातील असती, जिल्ह्यातल्या नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघातील असती तर नेत्यांची गर्दी तिच्या घरी मावली नसती..मात्र जिथे फायदा नाही तिथे नेते जातील कसे? बरोबर ना....