BIRTHDAY SPECIAL सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म, १८ वर्षी पतसंस्थेत शिपाई ते आता थेट M.D! शेतकरी पुत्र नंदकिशोर निकस यांची सक्सेस स्टोरी प्रेरणादायी...
Updated: Jul 14, 2024, 12:03 IST
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है! पंखो से कुछ नही होता हौसलो से उडान होती है..!" असा एक हिंदी शेर आहे... तो तंतोतंत लागू होतो सप्तशृंगी महिला अर्बन जानेफळ शाखेचे व्यवस्थापक तथा तळजाई ग्रुपचे एम. डी नंदकिशोर निकस यांना. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या नंदकिशोर निकस यांनी अल्पावधीत मेहकर तालुक्यात आपला नावलौकिक कमावला आहे.. जिद्द,चिकाटी आणि समाजहिताची प्रामाणिक तळमळ असली की अशक्य अस काहीच नसत हेच सूत्र नंदकिशोर निकस यांच्या आजवरच्या यशाचे गमक म्हणावे लागेल...
कर्तुत्वान , प्रतिभाशाली आणि कीर्तीवंत असे व्यक्तित्व सामान्य कुटुंबातून येत असल्याचे शेकडो उदाहरणे डोळ्यांसमोर येतील. यामध्येच नंदकिशोर निकस यांचंही एक ताजतवान उदाहरण पुढं आलं आहे. मेहकर तालुक्यातील जानेफळ येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मारुती पेठ या गावात नंदकिशोर निकस यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. पण परिस्थितीवर मात करत इतिहास रचण्याचे ध्येय उराशी होते. गरिबीची चटके सहन करत निकस यांनी आपले शालेय जीवन पूर्णपणे अभ्यासात झोकुन दिले. कमी बोलणे, जास्त ऐकणे आणि याहीपेक्षा अधिकाधिक चिंतन करणे हा त्यांचा स्थायीभाव. आई वडील शेतात जायचे अस्मानी - सुलतानी संकटांशी झुंज द्यायचे, आर्थिक संकटाशी दोन हात करत कुटुंबाचा संभाळ करीत एकुलत्या एक लेकराला उच्चशिक्षित करण्यास ते यशस्वी ठरले. मग काय पोरानेही आई-वडिलांच्या कष्टाचा चीज करून दाखवू ! अशी प्रतिज्ञा केली.
दहावी बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नंदकिशोर निकस यांनी वडिलांच्या कामात हातभार लावायला सुरुवात केली. दूध विक्री करणे, शेतातील छोटी मोठे कामे उरकणे, घरची काही कामे अशा कामात ते गुंतून राहत होते. यामुळे विचित्र तरुणाईच्या विश्वाशी त्यांचा संबंधही आला नाही. इतकच काय तर, लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाप्रती प्रचंड निष्ठा, संत साहित्याची गोडी, अभंग ऐकणे, कविता ऐकणे असे त्यांचे आवडते छंद. पुढे आपल्या भावनांनी व्यापलेल आकाश मुसळधार पावसासारख कोसळून व्यक्त होण्यासाठी त्यांनी कविता लिहिण्याच्याही प्रयत्न सुरू केला. परिणामी आज ते उत्कृष्ट कवी आहेत. कुटुंबातील आर्थिक स्थिती सदृढ करण्यासाठी तरुणपणापासूनच ते झटपटले. शेतीच्या कामातून पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही म्हणून त्यांनी जानेफळ येथील सप्तशृंगी महिला अर्बनमध्ये शिपाई पदाची नोकरी केली. पण एवढ्यावर थांबणार ते निकस कसले! ध्येयवेडे नंदकिशोर यांनी पतसंस्थेतील इतर आर्थिक कामकाज निरखून बघितले, अभ्यास केला, त्यांनतर जानेफळ पंचक्रोशीत सहकार क्षेत्रात आदरण घेतलेलं नाव म्हणजे केशव अवचार यांच्याशी त्यांचा परिचय झाला. अवचार यांच्या मदतीने त्यांनी सहकार क्षेत्रात त्यावेळी खऱ्या अर्थाने पदार्पण केले. लोणी गवळी येथे सर्वप्रथम शाखा व्यवस्थापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.
पतसंस्थेचे कामकाज सांभाळतानाच इतर काही उद्योगशील व्यवसायात त्यांनी लक्ष घातले. यामध्ये दुग्ध , गॅस विक्री, ठिबक विक्री असे उद्योग त्यांनी अतिशय परिश्रमातून उभारले. वर्षभरात मेहकर तालुक्यात त्यांच्या विविध उद्योगाला अनेकांनी पसंती दिली. पतसंस्थेचे व्यवस्थापक आणि युवा उद्योजक अशी तेव्हा त्यांची ओळख बनली. सर्वसामान्य जनतेशी प्रामाणिक राहून आणि प्रगतीसाठी साहस ठेवून सहकार क्षेत्रात करियर करायचे असे त्यांनी ठरवले. शाखा व्यवस्थापकाच्या दीर्घ अनुभवानंतर त्यांनी स्वतः तुळजाई महिला अर्बन नावाने पतसंस्था उभी केले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि सुस्वभावामुळे यावेळी अनेकांनी नंदकिशोर निकस यांना पुढे होण्यासाठी मदत केली. हे सर्व घडून गेल ते वयाच्या २५-२६ वर्षांमध्येच. जानेफळ पंचक्रोशीत युवकांसाठी खरे आदर्श ठरले नंदकिशोर निकस.
पतसंस्थेचे जाळ जसे विस्तारले तसेच त्यांची अनेक उद्योगे विस्तारीत त्यांनी केले, नवनवीन उद्योगात लक्ष घालून ते प्रत्यक्षात आणले, तुळजाई फार्मर प्रोडूसर कंपनी, तुळजाई इन्फ्रास्ट्रक्चर, तुळजाई ऍग्रो केमिकल्स, तुळजाई वॉटर सोल्युशन, अश्या प्रकारचे नाना उद्योग व्यवसायात नंदकिशोर निकस यांना घवघवीत असे यश मिळाले. भक्ती आणि सेवेचा भाव ठेवून त्यांनी गोशाळाही बांधली. विशेष म्हणजे, जानेफळच्याया शेतकरी पुत्राने गोव्यातही आपली ओळख निर्माण केली. गोव्यासारख्या पर्यटन स्थळी त्यांनी प्रशस्त असे हॉटेल उभारले आहे. नंदकिशोर निकस यांनी हे सगळं कमावलं ते केवळ ३१ व्या वर्षांपर्यंत. एखाद्याला आपली ओळख निर्माण करण्यासाठी अख्ख आयुष्य झिझावं लागत पण.. ते मन मे हे विश्वास असे म्हणत नंदकिशोर निकस यांनी तरुणाईत करून दाखविले. ही जेवढी कौतुकाची बाब आहे, त्यापेक्षा जास्त प्रेरणादायी आहे.
गाठला १५० कोटीचा टप्पा !
विविध कंपन्या प्रत्यक्षात आणल्यानंतर गेल्या तीन वर्षात नंदकिशोर विकास यांनी तुळजाई ग्रुपच्या एमडी पदाचा पदभार स्वीकारला. सहकाऱ्यांच्या मार्गदर्शने संस्थेने आतापर्यंत १५० कोटींचा टप्पा गाठला असून यामध्ये सर्वाधिक योगदान ग्रुपचे चेअरमन डॉ. केशव अवचार यांचे आहे असे निकस सांगतात. नंदकिशोर निकस यांनी डॉक्टर अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कांद्याला खांदा लावून स्वतःच्या यशाचे आकाश विस्तारित केले. आज रोजी तुळजाई ग्रुपच्या माध्यमातून २०० तरुण मुलांना रोजगार दिल्या जातो, ५० महिलांनाही रोजगार व गोशाळेत २५ गाईंचे संगोपन केल्या जाते.
तुळजाई फार्मर्स कंपनी मार्फत जवळपास हजार शेतकरी तुळजाई महिला अर्बनचे सभासद बनले आहे. गेल्या तीन वर्षात ११ हजार ठेवीदार, कर्जदार, सभासद पतसंस्थेत आले आहेत. पतसंस्थेच्या एकूण ११ शाखा असून ५५ कोटी रुपयांची ठेवी जमा आहे. तसेच तुळजाई ऍग्रो केमिकलचे २५८ पेक्षाही जास्त प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुळजाई वॉटर सोल्युशनमार्फत संपूर्ण विदर्भात ५०० वितरकांचे जाळे पसरले. व तुळजाई इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून अनेक गावागावांमध्ये जलजीवन चे कामे सुरू झालेली आहे. अश्या प्रकारे तुळजाई समूहाचे पतसंस्थेचे आणि विविध उद्योगाचे नेटवर्क जिल्हाभरात मजबूत होत आहे. तुळजाई ग्रुपचे आज वरचे टोटल बजेट तब्बल १५० कोटींच्या घरात पोहोचले आहे.