BIRTHDAY SPECIAL सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म ते राज्याच्या शेतकरी चळवळीचा चेहरा! रविकांत तुपकरांचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता!

लाल दिव्याची गाडी,२४ तास ७ -८ बॉडीगार्ड अन् मुंबईत शासकीय बंगला,वयाच्या तिशीच्या आत एवढं मिळाल्यावर कुणाच्या डोक्यात यशाची हवा जाणार नाही? मात्र रविकांत तुपकर त्याला अपवाद ठरलेत;..कारण संघर्षाची लढाई स्वतःसाठी, स्वतःच्या लेकरा बाळांसाठी नव्हतीच ! शेतकरी म्हणतात, भाऊ आता थांबायचे नाही, लढायचेच..

 
rt

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि त्याच पैशातून पुन्हा पुन्हा सत्ता ही भारतीय लोकशाहीला लागलेली कीडच म्हणावी लागेल..राजकारण आता केवळ पैसेवाल्यांच काम झालंय अस बोलणारी माणसं कमी नाहीत, "छे.. छे शेतकऱ्याच पोरगं कुठं नेतृत्व करू शकत काय? ते आपल काम नव्हं, बैल दावणीला जुपाव अन् वावरात मुकाट्यानं काम करावं ह्योच आपला पिढीजात धंदा..ते लोक आपल्याला तिथं टिकू द्यायचे नाहीत.." शेतकऱ्याच्या पोराच्या घरात राजकारणाचा विषयही निघाला तरी घरातल्या मोठ्यांचे हे शब्द ठरलेले..मात्र परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी काम करण्याची प्रामाणिक तळमळ, कामाप्रती असलेली श्रद्धा त्या प्रतिकुलतेवर मात करण्याची शक्ती नक्कीच देते..सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म ते राज्याच्या शेतकरी चळवळीतील मोठे नेतृत्व, ज्यांच नुसत नाव ऐकल तरी शेतकऱ्यांना लुटू पाहणाऱ्या अधिकारी,नेत्यांची घाबरगुंडी उडते ते म्हणजे रविकांत तुपकर यांच्या बाबतीत वरील सर्व बाबी लागू होतात. रविकांत तुपकर यांचा आजवरचा हा प्रवास सोपा नव्हताच..प्रचंड संघर्ष म्हणजे काय असत तर ते रविकांत तुपकरांच्या आजवरच्या प्रवासाकडे पाहून कळेल..अर्थात हा संघर्ष स्वतःसाठी नव्हताच, स्वतःच्या लेकरा- बाळांसाठी, संसारासाठी नव्हता. तो होता, जगाचा पोशिंदा असलेल्या कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे म्हणून.. तुपकरांचे हेच वेगळेपण त्यांना इतर राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे ठरवते अन् त्यामुळेच तुपकरांच्या एका हाकेवर हजारो शेतकरी, तरुण, माय - माऊल्या एका ठिकाणी एकत्र येतात..संघर्षातून पुढे येत राज्याच्या शेतकरी चळवळीतच नव्हे राज्याच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या रविकांत तुपकरांचा आज,१३ मे रोजी वाढदिवस..त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला त्यांच्या कार्याचा हा आढावा..

rt

बुलडाणा तालुक्यातील सावळा या  या छोट्याशा गावात सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रविकांत तुपकरांनी अल्पावधीत शेतकऱ्यांच्या हृदयात आदराचे स्थान निर्माण केलेय. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतलेल्या तुपकरांचे माध्यमिक शिक्षण बुलडाणा शहरातील भारत विद्यालयात झाले. वडिलांनी शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या दुग्धव्यवसायाला त्यांनी हातभार लावला. सकाळी लवकर उठून दुधाची धार काढायची अन् नंतर सायकलला दुधाच्या कॅटल्या अडकवून बुलडाणा शहरात घरोघरी दूध विकायचे त्यानंतर शाळेत जायचं हा रविकांत तुपकरांचा शालेय जीवनातला दिनक्रम! संसार चालविण्यासाठी शेतकऱ्याच्या वाट्याला किती संघर्ष येतो हे त्यांनी बालवयात अनुभवलं..दुधाचे भाव, दुधाळ जनावरांना लागणाऱ्या खाद्याचे भाव..शेतात पेरणी करतेवेळी बियाणे, खतांचे भाव आणि त्यानंतर शेतकरी माल विकतो त्यावेळी त्याने घामातून पिकवलेल्या शेतमालाचे भाव यातील प्रचंड तफावत रविकांत तुपकर पहात होते.. माय बाप शेतकऱ्यांची होत असलेली लूट पाहून तुपकरांच्या आतील चळवळ्या कार्यकर्ता विद्यार्थीदशेतच जागा झाला.. अन् शरद जोशींच्या विचारांनी प्रभावित होऊन ते शेतकरी संघटनेत काम करू लागले.

   रांगड्या आंदोलनांनी इतिहास घडवला..

fff
    
रविकांत तुपकर आणि शेतकरी आंदोलन हे समीकरण आता जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला पाठ झालेय. "आरे ला कारे" नेच उत्तर देण्यावर विश्वास ठेवणारे तुपकर स्वतःला क्रांतीकारी भगतसिंगांचे अनुयायी मानतात. "लेकरू रडल्याशिवाय माय सुद्धा त्याला लवकर दूध पाजत नाहीत" हा दाखला देत तुपकर आंदोलनाचे महत्व पटवून देतात. तुपकरांनी आतापर्यंत केलेल्या प्रत्येक आंदोलनचा रिझल्ट आहे.. तुपकरांच्या आंदोलनाचा इतिहास पाहता त्यांनी केवळ आंदोलनाचा इशारा दिला तरी सरकारकडून अनेक मागण्या मान्य होतात, एवढा धसका शासन प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाचा घेतलाय. विद्यार्थी दशेत असतांना जिल्ह्यात येणाऱ्या मत्र्यांच्या गाड्या अडवणे असो की अगदी अलीकडचे आत्मदहन आंदोलन.. शेतकऱ्यांसाठी  केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर राज्यातल्या विविध पोलीस ठाण्यात शेकडो  गुन्हे दाखल आहेत, मात्र हे गुन्हे माझ्या अंगावर असलेले अलंकार आहेत, शेतकऱ्यांसाठी केवळ गुन्हेच काय तर जीव द्यायची आपली तयारी असल्याने तुपकर अनेकदा सांगतात अन् तसे आंदोलन करतातही..शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळावी म्हणून स्वतःला गड्डयात गाडून घेणे असो की, सोयाबीन भाववाढीसाठी त्यांनी केलेले अन्नत्याग आंदोलन असो..जीवावर बेतणारी अनेक आंदोलने या अवलिया शेतकरी नेत्याने केली आहेत आणि प्रत्येक आंदोलनातून शेतकऱ्यांच्या पदरात भरभक्कम पाडून दिले आहे. बुलडाण्यात झालेल्या आक्रोश मोर्चात जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तुपकरांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले, त्यानंतर मुंबईत अरबी समुद्रात उडी मारण्यासाठी गेलेल्या तुपकरांना सरकारला चर्चेला बोलावले, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यासाठी तातडीने १५७ कोटी रुपयांची मदत या आंदोलनाने शेतकऱ्यांच्या पदरात पडली.
     
आत्मदहन आंदोलनाची देशभर चर्चा..!

rt

    पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांकडून विम्यापोटी प्रीमियम म्हणून भरपूर रक्कम जमा करून घेतली, मात्र शेतकऱ्यांना योग्य तो परतावा दिला नाही..त्यामुळे पीक विमा, अतिवृष्टीची मदत यासह अनेक मागण्यांसाठी तुपकरांनी केलेल्या आत्मदहन आंदोलनाची देशभर चर्चा झाली.  "एकतर आमच्या मागण्या मान्य करा,आमचे जगणे मान्य करा नाहीतर तुम्हाला आमचे मुडदे हवे असतील तर आम्हाला गोळ्या घाला नाहीतर आम्हाला जीव देऊ द्या" असा इशारा देत रविकांत तुपकरांनी आत्मदहन आंदोलनाची घोषणा केली. ११ फेब्रुवारीला हे ऐतिहासिक आंदोलन बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाले. जिल्हाभरातील जवळपास सगळेच पोलीस अधिकारी त्यादिवशी बंदोबस्तासाठी तैनात होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे सारे रस्ते पोलिसांनी बंद केलेले... एवढा बंदोबस्त की चिटपाखरू देखील पोलिसांच्या परवानगीशिवाय प्रवेश करू शकणार नाही..मात्र आंदोलन कसे करावे यात "पीएचडी" केलेल्या रविकांत तुपकरांनी यावेळी छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचा आधार घेतला. पोलीसांनी स्वप्नात देखील ज्याचा विचार केला नव्हता तेच तुपकरांनी केले. खाकी वेशात येऊन रविकांत तुपकरांनी पत्रकार, पोलीस अन् शेतकरी कार्यकर्त्यांना देखील आश्चर्याचा धक्का दिला..जो इशारा दिला ते तुपकरांनी करून दाखवले, अंगावर डिझेल ओतून घेतले, त्याचवेळी पोलिसांनी माचिस हिसकावून घेतल्याने पुढील अनर्थ टळला..मात्र रविकांत तुपकर शेतकऱ्यांसाठी जीव द्यायला तयार असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तुपकरांसह त्यांच्या २५ पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, त्यांना अकोल्याच्या कारागृहात पाठवण्यात आले..काही दिवस कारागृहात घालवल्यानंतर तुपकरांची सुटका झाली..या आंदोलनाच्या दणक्याने पीक विमा कंपनीने ४२ कोटी रुपये जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले ही या आंदोलनाची उपलब्धी ..!

  लाल दिव्याच्या गाडीला लाथ मारणारा नेता..!

rt

    जे सामान्यांना अशक्य वाटतं तेच तुपकर मात्र करून दाखवतात.राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना रविकांत तुपकरांना वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आले. कोणतीही निवडणूक न लढता नेतृत्वगुणांच्या भरवश्यावर त्यांना राज्यमंत्री दर्जाचे पद मिळाले. शासकीय वाहन, २४ तास ७ -८ बॉडीगार्ड, मुंबईत शासकीय बंगला..वयाच्या तिशीच्या आत एव्हढ सगळ मिळाल्यावर कुणाच्या डोक्यात यशाची हवा जाणार नाही?  मात्र शेतकऱ्यांसाठी जीवनाचा होम करायला तयार असणारा हा नेता मात्र त्याला अपवाद ठरला. पदाचा, लाल दिव्याच्या गाडीचा उपयोगही त्यांनी सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षासोबत मतभेद झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला..मनात आणल असत तर तुपकर स्वतःचे पद वाचवू शकले असते, अर्थात त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा रविकांत तुपकरांसारखा दमदार नेता त्यांच्याकडे हवा होता..मात्र आधी सांगितल्याप्रमाणे रविकांत तुपकरांचा संघर्ष स्वतःसाठी अन् स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हता, त्यामुळे "श्वास विश्वासातूनी निष्टा असे नेत्यावरी" या उक्तीप्रमाणे एका क्षणात रविकांत तुपकरांनी पदाचा राजीनामा दिला, लाल दिव्याच्या गाडीला लाथ मारून रविकांत तुपकर मुंबईवरून लालपरीने बुलडाण्यात पोहचले..!

अनेकदा संधी हुकली आता तरी लढा...!

rt
    
  रविकांत तुपकर यांच्या पाठीशी सर्वसामान्य शेतकरी जनतेचे मोठे पाठबळ आहे. २०१४ ला रविकांत तुपकरांनी चिखली विधानसभेतून लढण्याची तयारी केली होती. मात्र जागावाटपात चिखलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळू शकली नाही. भाजपच्या सूरेशआप्पा खबुतरेंनी निवडणूक लढवली. त्यावेळी देशभरात मोदी लाट असताना चिखली विधानसभेत मात्र काँग्रेसचे राहुल बोंद्रे विजयी झाले. कदाचित रविकांत तुपकर त्यावेळी महायुतीचे उमेदवार असते तर निवडणूक निकालाचे चित्र वेगळे असते असे आजही अनेक राजकीय विश्लेषक बोलून दाखवतात. २०१९ च्या विधानसभा अन लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांच्यावर तसा अन्यायच झाला. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे,सर्वसामान्य जनतेचे पाठबळ असूनही रविकांत तुपकरांना अद्याप निवडणूक लढण्याची संधीच मिळाली नाही. आता मात्र थांबायचे नाहीच असे म्हणत रविकांत तुपकरांच्या समर्थकांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. मेहकर तालुक्यातील एका गावाने तर तुपकरांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरीता ५ लाखांची वर्गणी सुद्धा जाहीर केली आहे. आता काहीही झाले तरी निवडणूक लढायचीच हा चंग स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे, त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक रंगतदार ठरणार आहे. तूपकरांचा जिल्हाभरात असलेला दांडगा जनसंपर्क पाहता ही निवडणूक तुपकरांना अतिशय सोपी जाईल अशी चिन्हे आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असला तरी विरोधकांसमोर तुपकरांनी चांगलेच कडवे आव्हान निर्माण केले आहे.

सामान्यांचा नेता सामान्यांसारखा वाढदिवस..!

rt
  
हल्ली राजकीय नेत्यांचा वाढदिवस म्हटले की लाखोंची उधळपट्टी ठरलेली. सगळीकडे बॅनरबाजी करायची, बॅनर लावायला कार्यकर्तेच नसल्याचे स्वतःच्या पैशातून बॅनरबाजी करण्याचा सध्याचा ट्रेण्ड..मात्र शेतकऱ्यांचा हा नेता मात्र त्याला अपवाद ठरलाय.. त्यांनी कधीच अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला नाही, दरवर्षी सरळ साधा वाढदिवस कार्यकर्ते साजरा करतात..इतर दिवसांसारखे याही दिवशी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या कार्यालयात बसून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवायच्या आणि तिथेच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शुभेच्छांचा स्वीकार करायचा...! असाच साजरा होता सर्वसामान्यांच्या नेत्यांचा सर्वसामान्यांसारखा वाढदिवस..! या वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकरी नेत्याला खूप खूप शुभेच्छा..!!