मोठी बातमी! जमते वाटते आता! मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला म्हणत्यात; श्वेताताई महाले,संजय कुटे की संजय रायमुलकर?

कुणाची लागणार वर्णी? जिल्ह्याला लवकरच नवे पालकमंत्री मिळण्याची शक्यता! वाचा काय आहे संभाव्य तारीख..
 
politics
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज, उद्या आज उद्या म्हणता म्हणता एकदाचा सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल देऊन टाकला. शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही प्रतिवादी निकाल आपल्यासाठी समाधानकारक असल्याचा दावा करीत आहेत. शिंदेच्या शिवसेनेने नेमलेला प्रतोद चुकीचा, राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणे चुकीचे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचे न्यायालयाने सांगितले नाही. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय. त्यामुळे निकाल आता आपल्याच बाजूने लागण्याचा विश्वास शिंदेच्या शिवसेनेला आहे. सरकार स्थिर असल्याची खात्री झाल्यानंतर राज्यात आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा शिंदे - फडणवीस सरकारचा इरादा आहे. त्यासाठी संभाव्य तारीख देखील निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. २३ किंवा २४ मे रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
 

     गेल्या वर्षी जून महिन्यात राज्यात सत्ता संघर्षाचे महानाट्य पार पडले. यात शेवटी एकनाथ शिंदेंनी बाजी मारली, हाती असलेले मंत्रीपद सोडून आधीच्या शिवसेनेतील अनेक मंत्री शिंदेच्या सोबत गेले. त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंना त्यांच्या नावाचा विचार करावा लागला, त्यातून सुद्धा बच्चू कडू सारख्यांना वगळण्यात आले. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपले जमेल असा विश्वास सध्या अनेक आमदारांना वाटतोय. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार करतांना शिवसेनेच्या कोट्यातील मंत्रिपदाचा विचार करतांना शिंदेंना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. यात काही आमदार नाराज होणार नाही याकडे शिंदेंना लक्ष द्यावे लागेल.

  बुलडाणा जिल्ह्यात कुणाला संधी?

आधीच्या मंत्रिमंडळ विस्तारात बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला भोपळा आला. संजय कुटे,आमदार श्र्वेताताई  महाले आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कोट्यातून मेहकरचे आमदार संजय रायमूलकरांच्या नावाची  चर्चा होती. मात्र त्यावेळी कुणाचेही जमले नाही. जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गुलाबराव पाटलांकडे बुलडाण्याचा अतिरिक्त कारभार देण्यात आला. गुलाबराव पाटलांनी मात्र बुलडाण्याला सावत्रा सारखीच वागणूक दिल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. मात्र आता नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात काम करणाऱ्या संजय कुटेंना संधी मिळते की महिला आमदार, आक्रमक नेतृत्व म्हणून आमदार श्वेताताईंना संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल. तसे पाहता संजय कुटे आणि आमदार श्वेताताई दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस दोघांपैकी कुणाची निवड करतात ते महत्वाचे ठरेल. दुसरीकडे खासदार प्रतापराव जाधवांमुळे मेहकरातून ३ वेळा आमदारकी मिळवलेल्या आमदार संजय रायमुलकरांना यावेळी संधी मिळते का हे पाहणेही महत्वाचे ठरेल. तिकडे काहीही होवो..मात्र आता तरी जिल्ह्याला स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळाला पाहिजे अशा भावना अनेकांडून व्यक्त होत आहेत.