उपवासाला भगर खाणार आहात का? त्याआधी ही बातमी वाचा! विषबाधा होऊ नये म्हणून "ही" घ्या काळजी! नाहीतर...उलट्या, मळमळ, ऍसिडिटी, ताप अन्...

 
बुलडाणा(अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज ८ मार्चला सगळीकडे महाशिवरात्री अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाशिवरात्रीला जवळपास सर्वच जण उपवास धरतात. उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते, दरम्यान भगरीचे सेवन केल्याने विषबाधा झाल्याच्या अलीकडच्या काळात राज्यात आणि जिल्ह्यात घडल्या आहेत, त्यामुळे भगरीचे सेवन करतांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
  भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमीगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. अशा बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते.
ही घ्या काळजी...
बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीट बंद भगर खरेदी करा. ब्रँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकिटे व सुटी भगर घेऊ नका. भगर घेताना पाकिटावरचा पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ व कोरड्या ठिकाणी व्यवस्थित झाकण बंद डब्यात ठेवा, जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते त्यामुळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी/भात खावा. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका बाहेरून दळून आणण्यापेक्षा घरीच दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनेयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तीन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांच्या सेवनाने ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे उलटी व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्ती नुसार मर्यादेतच करावे.