Amazon Ad

कौतुकास्पद! अंचरवाडीच्या गौकर्णा परिहार ठरल्या राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतीशिल महिला शेतकरी पुरस्काराच्या मानकरी! जिल्हा परिषदेत कृषी दिन साजरा..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृहात साजरी करण्यात आली. कृषी दिनानिमित्त उपक्रमशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अध्यक्षस्थानी होते. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्ह्यातील ११ प्रगतीशील महिला शेतकऱ्यांना राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतीशील महिला शेतकरी सन्मान पुरस्कार, १३ प्रगतीशील पुरुष शेतकऱ्यांना कै. वसंतराव नाईक प्रगतीशील शेतकरी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच गौकर्णा परिहार, रा. अंचरवाडी, ता. चिखली यांना ११ हजार रूपयांचे पारितोषिक देवून राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतीशिल महिला शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले. आवचितराव पालकर, रा. सातगाव म्हसला, ता. बुलडाणा यांना ११ हजार रूपयांचे पारितोषिक देवून कै. वसंतराव नाईक प्रगतिशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी मुलांना शालेय जीवनापासून शेतीची आवड निर्माण व्हावी, यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा. असे मनोगत व्यक्त केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक नरेंद्र देशमुख यांनी देशी गोपालन व दुग्ध व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले. महिला प्रगतीशील शेतकरी गौकर्णा परिहार यांनी शेतातील उपक्रमाची माहिती दिली. अवचितराव पालकर यांनी शेतातील केशर आंबा लागवड व त्यापासून आलेले उत्पन्न, सामुहिक शेततळे, दुग्ध व्यवसाय, गांडुळ खत युनिटचा शेतीला फायदा होत असल्याचे सांगितले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी प्रास्ताविकातून वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, तसेच कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाला कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक विकास जाधव, शास्वज्ञ श्री. कानवडे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री. ठाकरे, कृषि विकास अधिकारी विजय खोंदिल, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी दिनकर मेरत आदी उपस्थित होते.