बुलडाण्यात आगळा वेगळा आदर्श विवाह सोहळा! असं लगीन तुम्ही नसनं पाहिलं..! सावधान नव्हे, संविधान..

 
बुलडाणा( राजेंद्र काळे: लाइव्ह ग्रुप नेटवर्क): 'आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना: सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता;‍ निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आपल्या या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर २६, १९४९ला एतद्द्वारे या संविधानला अंगीकृत, अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत..'
Nk
                     जाहिरात 👆
भारतीय संविधानाची ही उद्देशिका अर्थात प्रास्ताविका वाचण्यात आली नवदांपत्यांकडून मंगल परिणयात विचारपिठावर. त्यामुळे ही 'घटना' भारतीय समाजाला नवी संविधानिक विचार देणारी ठरली.
बुलढाणा येथील पत्रकार सिद्धार्थ आराख यांची सुकन्या शुभांगी हिचा मंगल परिणय रविवार २४ डिसेंबर रोजी येथील उदयनगर येथील अंभोरे परिवारातील सुमित यांच्याशी संपन्न झाला, तो येथील आराध्या लॉन्सवर. शुभांगी अन् सुमित हे दोघेही उच्चविद्याविभूषित. त्यामुळे केवळ 'धार्मिक विधी' न करता 'राष्ट्रीय विधी' अर्थात राष्ट्रधर्म सुद्धा या परिणातून प्रतीत करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा मंगल परिणययासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांना भावून गेला.
विवाह म्हणा की मंगल परिणय, त्यातली भाषणबाजी या सोहळ्यातून टाळण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ व मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते दारक-दारिकेला 'भारतीय संविधान' भेट देण्यात आले. त्यानंतर मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, आ. संजय गायकवाड व मंत्रालय उपसचिव सिद्धार्थ खरात यांना विचारपिठावर बोलावून त्यांच्या उपस्थितीत शुभांगी व सुमित यांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे जाहीर वाचन करून राष्ट्रधर्म पाळण्याची शपथ घेतली.
लग्नात साधारणत: 'सावधान' शब्द उच्चारला जातो, परंतु या ठिकाणी दिसले ते 'संविधान'..
त्यामुळे भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेला हा 'परिणय' सोहळा खऱ्या अर्थाने 'मंगल' ठरला !