अधिवेशनाला दांडी मारून शिवसेना खासदारांचे पक्षाच्या कार्यक्रमांना महत्त्व!; खासदार जाधव यांच्याकडे वाशिमची जबाबदारी
शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे शिवसंपर्क अभियान सुरू आहे. जिल्ह्यातील नेते कार्यकर्त्यांशी नीट संपर्क ठेवतात का, कुठे पक्षांतर्गत गटबाजी आहे का, लोकप्रतिनिधी पक्षाची जबाबदारी नीट पार पाडतात का अशा सर्व बाबींची शहनिशा या अभियानात होणार आहे. त्यामुळे खासदारांकडे स्वतःच्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी न सोपवता दुसऱ्या क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्याची जबाबदारी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. २२ मार्चपासून त्यांनी जिल्ह्यात ठाण मांडले आहे. बुलडाणा, चिखली आणि सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. आज, २४ मार्च रोजी संजय जाधव विधानसभेच्या मलकापूर, शेगाव, जळगाव जामोद मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. शिवसंपर्क अभियानाचा अहवाल ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविणार आहेत. मात्र अधिवेशन सोडून खासदारांना पक्षाच्या कामात गुंतवल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे.