Amazon Ad

युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखांची थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार! म्हणाले, असे कसे कलेक्टर?

आमचं ऐकून घेत नाही, उलट आम्हालाच दमदाटी करतात; आमचं खोटं वाटतं असेल तर करा म्हणाले सीसीटीव्ही चेक!कारवाई करण्याची मागणी; मंडपगावचे ग्रामस्थ गेले होते निवेदन द्यायला...
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे. इतकेच काय तर प्रशासकीय कर्मचाऱ्याच्या अंगावर टीप्पर घालण्या इतपत त्यांची मजल गेली आहे. याच वाळू माफीयांच्या टिप्परने अनेकांना चिरडल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत . रेती घाटांपासून जवळ असलेल्या गावांना या माफियांचा प्रचंड त्रास होतोय. वाळू माफियांना कुणाचे अभय ? असा सवालच यामुळे उपस्थित होतो आहे. रेती माफियांना वैतागलेल्या अनेक गावकऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी वाळू माफिया विरोधात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे कित्येक निवेदने दिली, तक्रारी दिल्या. मात्र समाधानकारक कारवाई झाली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आता तर थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधातच युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर गंभीर आरोप केले आहे. जिल्हाधिकारी पाटील आमचे ऐकूण घेत नाही, उलट आम्हालाच दमदाटी करतात असा आरोप करीत आमचे खोटे वाटत असल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातील सीसीटीव्ही तपासा अशी मागणी केली आहे. युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर आणि देऊळगावराजा तालुक्यातील  मंडपगावचे सरपंच सचिन कदम यांनी काल, २६ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांची आयुक्तांकडे तक्रार केली आहे, तक्रारीची प्रत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि महसूलमंत्र्यांना देखील पाठवण्यात आली आहे.
    २ जून रोजी मंडपगाव येथील असंख्य ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे उपसल्या जाणाऱ्या अवैध रेती वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची दुर्दशा होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. या संदर्भात निवेदन देखील देण्यात आले होते. त्यांनतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पाटील यांना भेटण्याची वेळ मागितली. त्यानुसार, २४ जून रोजी ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यावेळी देखील त्यांनी त्यांचे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु जिल्हाधिकारी पाटील ग्रामस्थांवरच भडकले. "तुम्ही वारंवार आंदोलने करता, माझी व प्रशासनाची बदनामी करता. रात्रंदिवस तुमचीच रेती पाहतो, इथले ऑफिस उचलून तुमच्या गावात घेऊन येतो" असे जिल्हाधिकारी उपहासात्मक पद्धतीने म्हटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रेतीमाफी यांच्याविरोधात प्रशासन कोणतीच कारवाई करायला तयार नाही. जिल्हाधिकारी आमचे ऐकून घ्यायला तयार नाही, मग आम्ही आमची व्यथा मांडायची तरी कुणाजवळ असा सवाल संतोष भुतेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आमच्यावर दमदाटी करणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या विरोधात रीतसर कारवाई करावी अशी मागणी संतोष भुतेकर यांनी केली आहे.
काय आहे मंडपगावचा प्रोब्लेम?
मंडपगाव हे देऊळगाव राजा तालुक्यातील गाव असून खडकपूर्णा प्रकल्पाच्या काठावर वसलेले आहे. अवैध रेती माफिया प्रकल्पातून रेतीउपसा करतात आणि मंडपगावातून टिप्परची वाहतूक होते. दिवसाला ७० ते ८० टिप्पर या रस्त्यावरून धावतात. वजनदार आणि भरगच्च टिप्पर रस्त्यावरून धावत असल्याचे रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. यारस्त्यावरून दुचाकी सोडा पायी चालणेही कठीण झाले आहे. शिवाय टिप्पर वाले सुसाट धावत असल्याने लेकराबाळांच्या जीवालाही धोका आहे. मंडपगाववासीयांनी या रेतीमाफिया विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने गावकऱ्यांना रेतीमाफियांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. देऊळगावमही येथील काही माफियांनी मंडपगाव वासियांना थेट धमक्या दिल्या आहेत, तुम्ही आमच्या गावात येऊ नका.. आले तर तुम्हाला दाखवुन देऊ अशा धमक्या माफीयांनी दिल्याचे ग्रामस्थ सांगतात. हीच तक्रार घेऊन संतोष भूतेकर, सचिन कदम आणि ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेले होते..मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे ऐकून न घेता आता ऑफिसच तुमच्या गावात आणून बसवतो असे म्हणत आमचा अपमान केल्याचे भुतेकर यांचे म्हणणे आहे.