शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक;लवकर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली..
Jun 17, 2024, 11:28 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. थोड्याफार पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. गेल्या ६ दिवसांपासून मान्सूनच्या वाटचालीत समाधानकारक प्रगती झाली नसल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा तापमान वाढले आहे. कोकम, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला असला तरी उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.
विदर्भात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मान्सून दाखल झालेल्या भागातील पावसाने ब्रेक घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी चार ते पाच दिवस वाट पहावी लागण्याची शक्यता असल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.