सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! सोयाबीनवरील चक्रीभुंगाचे ओळख आणि एकात्मिक व्यवस्थापन कसे करायचे ते वाचा...

 
kldmdkj

बुलडाणा(जिमाका):  राज्यात सोयाबीन पिक सध्या फांद्या फुटण्याच्या किंवा फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. या किडीचा प्रादूर्भाव उगवणीनंतर २० ते ६० दिवस या कालावधीमध्ये होतो. सोयाबीनचे खोड पोखरणारी ही महत्वाची किड आहे. चक्रीभुंग्याच्या प्रादूर्भावामुळे ३५ टक्क्यापर्यंत नुकसान होते. सोयाबीन व्यतिरिक्त मुग, उडीद, चवळी, तूर, भुईमुग, मिरची, कारली आदी पिकांवर देखील चक्रीभुंग्याच्या प्रादूर्भाव होतो. यावर नियंत्रणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

किडींची ओळख

प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा ७ ते १० मिमी लांबीचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश ते अर्धा भाग काळ्या रंगाचे असतात. अंडी फिकट पिवळसर लांबट आकाराची असतात. पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते व डोक्याच्या मागील बाजूस थोडी मोठी असते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये जवळपास ७८ अंडी घालते.

नुकसानीचा प्रकार

प्रौढ भुंगा व अळी या दोन्ही अवस्था सोयाबीन पिकाचे नुकसान करतात. प्रौढ भुंगा पानाच्या मुख्य शिरा, देठ किंवा खोड यावर खरवडतो, त्यामुळे सोयाबीनचे जास्त नुकसान होत नाही. परंतू या किडीच्या अळी अवस्थेमुळे मुख्यत्वे पिकाचे नुकसान होते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन समांतर खाचा करतो व खालच्या खाचे जवळ अंडी घालण्यासाठी तीन छिद्रे पाडतो. खोडावर खाचा केल्यास २ ते ३ दिवसांनी वरचा भाग सुकायला सुरुवात होते. पानाच्या देठावर खाचा केल्यास पान वाळून जाते. पिक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यास जास्त प्रमाणात नुकसान होते. त्यामानाने प्रादुर्भाव ४५ ते ६० दिवसांनी झाल्यास कमी प्रमाणात नुकसान होते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात, तसेच शेंगा पूर्ण भरत नाहीत. एकरी झाडांची संख्या कमी होऊन नुकसान होते.

एकात्मिक व्यवस्थापन

पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिक तणमुक्त ठेवावे. चक्री भुंगा प्रादूर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या तात्काळ गोळा करून आतील किडीसह नष्ट करावेत.  सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव कमी असल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पिकांची फेरपालट करावी. सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पिक घेऊ नये. आर्थिक नुकसान पातळी  १० ते १५ टक्के प्रादूर्भावग्रस्त झाडे ओलांडल्यास क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल १८.५ एस ३ मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट १.९० ई सी ९ मिली किंवा प्रोफॅनोफोस ५० ईसी २० मिली किंवा टेट्रॅनीलीप्रोल १८.१८ एससी ५-६ मिली किंवा बीटा सायफ्लूथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमीडॅक्लोप्रीड १९.८ टक्के ओडी ७ मिली किंवा थायमिथॉक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा-सायलोथ्रिन ९.५० झेडसी २.५ मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल ९.३० अधिक लॅम्बडा-सायलोथ्रिन ४.६० झेडसी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात या रासायनिक कीटकनाशकांचा वापर फवारणीसाठी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.