शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! पुढील ५ दिवसांत असे राहील हवामान..!

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हात सतत ढगाळ वातावरण असले तरीही पिकांना पुरेल एवढाच पाऊस सध्या झालेला आहे. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे साठे अद्याप भरलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची आवश्यकता आहेच. भारतीय हवामान खात्याने आज, पुढील ५ दिवसांसाठी हवामान अंदाज जाहीर केला. बुलडाणा जिल्ह्यात ०२ ते ०४ ऑगस्ट दरम्यान बहुतांश ठिकाणी तर ०५ ते ०६ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ०३ ते ०६ दरम्यान तुरकळ ठिकाणी मेघगर्जना सह विजांचा कडकडा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या काळात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण कसे करावे, स्वतःची व जनावरांची योग्य काळजी घ्यावी यासाठी हवामान विभाग व जिल्हा कृषी विज्ञान केंद्राचे शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला दिलेला आहे.
  शेतकऱ्यांनी घ्यावी ही काळजी...
सोयाबीन पिकात पिवळ्या मोझाईक विषाणूजन्य रोगाचा प्रसार हा पांढऱ्या माशीमुळे होतो. संभाव्य प्रसार टाळण्यासाठी व पांढरी माशी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात ठिकठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. सध्याच्या हवामान परिस्थितीत मुग पिकावरील मावा, तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी फिप्रोनील ५ टक्के एस.सी२० मिली या कीटकनाशकाची फवारणी कोरडे हवामान असताना करावी.गोचीड या परजीवीमुळे जनावरांना पावसाळ्यात थायरेलिया या रोगाची लागण होऊ शकते.म्हणून या परजिवीच्या व्यवस्थापनासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी स्वतःची व आपापल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. खराब हवामान परिस्थिती असताना जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे.विजांच्या पुर्वसुचनेसाठी दामिनी या मोबाईल अपचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.