बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कधी? हवामान खात्याने सांगितली "ही" तारीख; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना....
Jun 21, 2024, 16:51 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जून महिना अर्ध्यापेक्षा जास्त संपला तरी बुलडाणा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. आतापर्यंत केवळ सहा ते दहा टक्के पेरण्या झालेले आहेत. अद्यापही जिल्ह्यातील ९० टक्के पेरण्या बाकी आहेत. अपुऱ्या पावसावर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशातच हवामान खात्याने आता बुलडाणा जिल्ह्यातील पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज, २१ जूनला प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार पुढच्या ५ दिवसांत बहुतांश ठिकाणी हलक्या ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची व वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे. तसेच २२ आणि २३ जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झालेला नाही. तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याने त्या भागातील त्या पेरण्या आटोपल्या असल्या तरी दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत उपयुक्त ओलावा व पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच ७५ ते १०० मिमी पाऊस होईपर्यंत पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.