पुढच्या ५ दिवसांत बुलडाणा जिल्ह्याचे हवामान कसे राहील? अवकाळीचा तडाखा पुन्हा बसणार?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मागील तीन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने टिनपत्र उडाले, घरांची पडझड होवून प्रचंड नुकसान झाले होते. शिवाय गत पंधरवड्यात जिल्ह्याचे तापमान ४० पार गेल्याने कडाक्याचा उकाडा सहन करावा लागला. परंतु पुढच्या पाच दिवसांत कोरडे हवामान राहणार असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या अंदाजामुळे तीव्र उन्हाने त्रस्त झालेल्यांना आणि अवकाळीने ग्रस्त झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. 
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला! 
  दरम्यान, हवामान अंदाज सोबतच कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रतिबंधीत करण्यासाठी कपाशी पिकाची मान्सूनपूर्व पेरणी टाळावी, सध्याचे वाढते तापमान लक्षात घेता निंबू, संत्रा, पेरू फळबागांना आवश्यकतेनुसार ओलीत करावे. तसेच वाढत्या उष्णतामानाचा जनावरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. अश्या सूचना जिल्हा कृषी हवामान केंद्र कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी दिल्या आहेत.