Amazon Ad

हे काय लावलं पावसानं? पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नुसती भूर्र भुर्र..! पावसाचा पॅटर्न खरचं बदललाय का?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हवामान विभागाने कितीही मान्सून सक्रिय झाला, कोसळणार,बरसणार असे म्हटले असले तरी तसा पाऊस यंदा अजून तरी बुलडाणा परिसरात बरसायला तयार नाही. काल पासून बुलडाण्याच्या आकाशात ढग दाटून आलेले दिसत असले तरी नुसती भुर्र भुर्र सुरू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातील खरं तर कोसळधार पाऊस अपेक्षित असतो मात्र अद्याप तरी तो तसा बरसला नाही..त्यामुळे पावसाळ्याच्या पॅटर्नच तर बदलला नाही ना अशी चर्चा आता शेतकरी वर्ग आणि हवामान अभ्यासकांमध्ये सुरू आहे.
साधारणः पावसाळा म्हटले की जून ते स्पटेंबर असा कालावधी आपल्यासमोर उभा राहतो. मात्र यंदा जून संपत आला तरी पावसाची पाहिजे तशी सुरुवातच झाली नाही. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ ढगाळ वातावरण असले तरी पावसाची नुसती भुर्र भुर्र सुरू आहे. त्यामुळे पेरणी करावी की नाही याबाबत बळीराजा देखील संभ्रमात असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी पावसाचा पॅटर्न बदलत असल्याचे मागच्या वर्षी सांगितले होते. पावसाळा चार महिने पुढे सरकत असल्याचे ते म्हटले होते. त्यामुळे हा तसा तर काही प्रकार नाही ना ? असाही प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान सद्यस्थितीत जिल्ह्यात काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असली तरी बहुतांश जिल्हा अजूनही कोरडाच आहे.