जिल्ह्याचा सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी विकास करणार! संदीप शेळकेंचे प्रतिपादन; मेहकर तालुक्यात वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला भक्कम प्रतिसाद...
Mar 14, 2024, 20:37 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक परंपरेचा गौरवशाली वारसा लाभलेला आहे. जगभरातल्या लोकांना बुलडाणा जिल्ह्याबद्दल कुतूहल आहे. मात्र बाहेरचे लोक जेव्हा जिल्ह्यात येतात, जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी देतात तेव्हा इथली अवस्था पाहून त्यांना आश्चर्य वाटतं..एवढं सगळ असूनही एवढ्या वर्षात पर्यटकांसाठी चांगली सोय आम्ही करू शकलो नाही, पर्यटकांना आकर्षित करू शकलो नाही हे आमच्या लोकप्रतिनिधींचे अपयश नाही का? असा सवाल करीत जनतेने लोकसभेत पाठवल्यास जिल्ह्याचा सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी विकास करून असा शब्द संदीप शेळके यांनी परिवर्तन रथयात्रेदरम्यान मेहकर तालुक्यातील विविध सभांना संबोधित करतांना दिला. १२ मार्चला वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला मेहकर तालुक्यातील विविध गावांत दमदार प्रतिसाद मिळाला यावेळी ते बोलत होते. तुम्ही बदल घडवा मी जिल्हा घडवतो असे ते यावेळी म्हणाले.
१२ मार्चला सायंकाळी डोणगाव आणि नागपूर येथे कॉर्नर सभा झाल्या. यावेळी पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, आजही बुलढाणा जिल्हा हा मागासलेपणाच्या यादीत गणला जातो. जिल्हावासियांसाठी ही मोठी खेदाची बाब आहे.जगाच्या पातळीवर बुलडाणा जिल्हा हा ऐतिहासिक ,सांस्कृतिक, अध्यात्मिक , तसेच पर्यटन बाबत वैभव प्राप्त असलेला एकमेव जिल्हा आहे. तरीसुद्धा या जिल्ह्यात पाहिजे तसा विकास झाला नाही. त्यामुळे आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी ३० वर्षात काय दिवे लावले? असा प्रश्न उपस्थित होतो संदीप शेळके म्हणाले.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निघालेली वन बुलढाणा मिशन या राजकीय चळवळीची परिवर्तन रथयात्रा सध्या मेहकर तालुक्यात आहे. याआधी खामगाव, शेगाव, संग्रामपूर, मोताळा तालुक्यात विकासाचे व्हिजन मांडून शेळकेंनी परिवर्तनाचा एल्गार पुकारला. शेळके यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मांडलेल्या विचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक दूर करण्यासाठी वन बुलढाणा मिशन या राजकीय चळवळीची सुरुवात केली. या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी " ब्ल्यू - प्रिंट " आम्ही तयार केली आहे. जनतेने खासदारकीची संधी दिली तर त्यावर पुरेपूर अंमलबजावणी आम्ही करणार असल्याचा शब्द संदीप शेळके यांनी दिला. ते म्हणाले जिल्ह्यात परिवर्तनाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणायची आहे. नदीजोड प्रकल्प ,प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी, उच्च दर्जाचे शिक्षण ,महिला सक्षमीकरण ,सिंचनाची सोय असा विस्तारित विकास अजेंडा घेऊन परिवर्तनाच्या दिशेने रथयात्रा मार्गक्रमण करत आहे. जनतेने संधी दिल्यास संधीच सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास नेमका कसा असतो हे आपण दाखवून देणार असल्याचे संदीप शेळके म्हणाले.
या"गावात झाला जागर परिवर्तनाचा!
अंजनी, आंधृड, लोणी गवळी, वरूड, घाटबोरी ,इसवी, यागावात सकाळी यात्रा पोहचली. त्यांनतर पांगरखेड, विठ्ठलवाडी, बेळगांव, डोणगाव, नागापूर येथे परिवर्तनाचा जागर करण्यात करण्यात आला.