बुलडाणा जिल्ह्यात पुढील ५ दिवस "असे" राहील हवामान..! पाऊस कधी अन् कसा? उत्तर बातमीत...मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची सुचना

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जून महिना संपत आला आहे. जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या आहेत. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने आलेले दुबार पेरणीचे संकट टळल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने आज,२८ जून रोजी बुलडाणा जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. हा अंदाज दिलासादायक असाच आहे. जिल्ह्यात आज उद्या आणि परवा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची व तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची व वादळी वाऱ्याची शक्यता आहे. १ व २ जुलै जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असेही अंदाजात म्हटले आहे.
शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी...
 जिल्ह्यात ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५-१०० मिमी) झाला आहे व जमिनीतील ओलावा पुरेसा आहे अशा ठिकाणी वापसा परिस्थितीत खरीप पिकांची पेरणी करावी. ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी शेतकरी बंधूनी पेरणीची घाई करू नये.जमिनीतील उपयुक्त ओलावा व पेरणीयोग्य पाऊस (७५-१००मिमी)या दोन्ही बाबींची खात्री करूनच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याला योग्य प्रमाणात शिफारसीत बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणी करताना नत्रयुक्त खतांचा अवास्तव वापर टाळावा.मिरची रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपांचे शेंडे डायमेथोएट ३०% @१० मिली १ ली. पाण्याच्या द्रावणात बुडवून लावावे. मुलस्थानी जल संवर्धनासाठी सोयाबीन पिकाची पेरणी रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पद्धतीने करावी. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी स्वतःची व आपापल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे.विजांच्या पुर्वसुचनेसाठी दामिनी या मोबाईल ॲपचा वापर करावा असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, व कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.