"जिल्ह्यातल्या ३५,३४६ गावकऱ्यांचे पाण्याचे वांधे! प्यायला पाणी मिळणे कठीण! जिल्हा प्रशासन करतेय "या" उपाययोजना
Mar 21, 2024, 12:01 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्ह्यातील अनेक गावांत जलसंकट उभे टाकले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली जात आहे. यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच जल संकट निर्माण झाले, यामुळे पुढील दिवसात पाण्याअभावी होणारी अडचण आणि त्याची तीव्रता अधिक असणार यात शंका नाही. गाव खेड्यातील तलावं कोरडे ठण झाल्याचे चित्र आहे.
पाण्याचे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जावा यासाठी पंचायत समिती कडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. तालुक्यातील रुईखेड टेकाळे, पोखरी, वरवंड, ढसाळवाडी, तसेच पिंपरखेड या गावांमधून टँकरची मागणी होत आहे. त्यामुळे या गावात जलसंकट निर्माण झाले आहे. तर देऊळगाव राजा तालुक्यातील कुंभारी, पिंपळगाव चिलमखा, सुरा, चिखली मधील हातनी, कोलारा, सातगाव भुसारी, डोंगरशेवली, धोडप, पळसखेड, बुलढाणा मधील वरवंड, पिंपरखेड, या गावांतील एकूण ३५,३४६ गावकऱ्यांचे बेहाल होत आहे. टँकरद्वारे होणारा पुरवठा पुरेसा नसल्याने गावकरी प्रामुख्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे ७ तालुक्यांतील ६४ गावांची तहान अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे भागविली जात आहे. यासाठी ८१ विहिरी अधिग्रहित करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील १९ गावांना तब्बल ३१ विहिरीद्वारे पुरवठा होत आहे. चिखलीत १४ गावांना १९ तर मेहकर तालुक्यातील १९ गावांना १९ विहिरीद्वारे पुरवठा करण्यात येत आहे.