गावगाडा आजपासून तीन दिवस ठप्प! राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांचे कामबंद; सरपंचांसह ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचाही सहभाग!
Dec 18, 2023, 11:02 IST
बुलडाणा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन कानावरही घेत नसल्याने ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या विविध संघटनांनी एकजूट होत शासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. आज, १८ ते २० डिसेंबरदरम्यान ग्रामविकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन छेडण्यात येणार आहे. ग्रामसेवकांच्या तीन दिवसीय कामबंद आंदोलनाला सरपंचांसह सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत संपात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.
आज, १८ डिसेंबरपासून तीन दिवस राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना कुलूप ठोकले जाणार आहे. २२ हजार ग्रामसेवक कामबंद करणार असल्याने ग्रामपंचायतींचा कारभार तथा गावगाडा ठप्प होणार आहे. ग्रामपंचायतस्तरावर काम करणाऱ्या सर्व कर्मचारी संघटनांनी यावेळी अभूतपूर्व एकजूट सरकारला दाखवून दिली आहे. ग्रामसेवक युनियन, संगणक परिचालक संघटना, ग्रामरोजगार सेवक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद, ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेत हे आंदोलन छेडले आहे.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करून पंचायत विकास अधिकारीपद निर्माण करावे, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करणे, ग्रामसेवकपदाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणे, शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेची पदवी करणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४९ च्या नियमात सर्व जिल्हा परिषदांच्या प्राप्त अहवालानुसार सुधारणा करणे, विस्तार अधिकारीपदांची संख्या वाढविणे, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्ती दिलेले मात्र १ नोव्हेंबर २००५ पूर्वी भरती प्रक्रिया चालू झालेल्या ग्रामसेवकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक भरती बंद करणे, शिक्षकांप्रमाणे ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधीत्व मिळणे अशा मागण्यांसाठी तीन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे.
'सरपंच, सदस्य, कर्मचाऱ्यांची अभूतपूर्व एकजूट
संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक आधीच आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपावर गेले आहेत. संप सुरू असतानाच त्यांनी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मागण्यांची सरकारने तातडीने पूर्तता करावी, यासाठी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. रहिवासी दाखला, जन्म, मृत्यू दाखल्यांसह ग्रामपंचायतीशी निगडित सर्व कामांचा तीन दिवस खोळंबा होणार आहे. त्याचप्रमाणे पाणीपुरवठाही प्रभावित होणार आहे.
ग्रामस्थांच्या सहकार्याची गरज
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना कुलूप लावून आंदोलन केले जाणार असल्याने सर्व कामकाज तीन दिवस ठप्प होणार आहे. न्याय्य हक्क मिळवून घेण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आल्याने नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन शासनाला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बुरकुल, जिल्हा सरचिटणीस देवेंद्र बरडे यांनी केले आहे.