पावसाच्या ब्रेकमुळे पेरणीचे प्रमाण घटले ! जिल्ह्यात केवळ ६ टक्के पेरण्या झाल्या;४२ हजार ८८ हेक्टरवर झाल्या पेरण्या...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली. परंतु, ऐन पेरणीच्या तोंडावर पाहिजे तसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे काल १७ जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ४२ हजार ८८ हेक्टरवर पेरणीचे कामे पूर्ण झाले आहे. केवळ ६ टक्केच पेरणी झाली असल्याची नोंद कृषी विभागाला प्राप्त आहे. यामुळे बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. 
  मृग नक्षत्रात जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात दोन तीन दिवस सातत्याने पाऊस बरसला. सुरुवातीलाच समाधान समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. एकीकडे पेरणी सुरू झाली, तर दुसरीकडे गत आठवड्यात पावसाने ब्रेक लावला. दररोज गडद आभाळ पहायला मिळत आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील अनेक भागात झाल्याचे दिसून आले. असे पाहता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना देखील ब्रेक लावला आहे. 
   
 जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात झाला. येथे ३०.०५ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झालेली आहे. खामगाव तालुक्यात ५९.६ मिमी, शेगाव तालुक्यात ७७.०१ मिमी, नांदुरा तालुक्यात ८०.७ मिमी, मलकापूर तालुक्यात ८३.०६ मिमी, मोताळा तालुक्यात १०१.०१ मिमी, मेहकर तालुक्यात ९३.०९ मिमी, लोणार तालुक्यात १२५.०७ मिमी तसेच जळगाव जामोद १३२.०० मिमी, सिंदखेडराजा १३७. ०६ मिमी, बुलढाणा १२८.०७, देऊळगाव राजा सर्वाधिक १४५.०३ तर चिखली तालुक्यात १००.०९ मिमी इतक्या पावसाची काल १७ जून पर्यंत नोंद झालेली आहे. यामध्ये कृषी विभागाकडून कळविण्यात येते की, १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. यापेक्षा अधिक प्रमाणात, जमिनीत पाणी मुरल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे सांगण्यात येते. 
पीकनिहाय पेरणी क्षेत्र! 
दरम्यान, ज्या भागांमध्ये पेरणी झाली त्यांचे पिकनिहाय पेरणी क्षेत्र पुढीलप्रमाणे..
पीक हेक्टर
सोयाबीन १३५०१  
मक्का ३४५०  
मुंग ३१   
उडद ५८   
कापूस १८३६१  
तूर ६६८७