रविकांत तुपकरांनी मेहकर तालुक्यात केली नुकसानीची पाहणी; प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची केली मागणी

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अवकाळी पावसाने सध्या जिल्ह्यातील विविध भागात थैमान घातले आहे. या अवकाळी संकटाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. रविकांत तुपकर यांनी आपला प्रचार थांबवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला. निवडणुकीचा काळ सुरु असला तरी प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
                  
 जिल्ह्यात एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसानेही थैमान घातले आहे. १२ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणी वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील काही भागात पिकांचे मोठे नुकसान केले. मेहकर तालुक्यातही बऱ्याच ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान सर्वसामान्य जनतेचे उमेदवार रविकांत तुपकर हे १३ एप्रिल रोजी मेहकर तालुक्यात प्रचार दौऱ्यावर असतांना त्यांनी आपला प्रचार थांबवून नुकसानग्रस्त भागात भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर देण्यास प्राधान दिले. गोहगाव दांदडे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून त्यांनी नुकसानीची पाहणी केली. या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा, मका यासह इतर पिकांची मोठी हानी झाली आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच विश्वी येथे वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून बुद्ध विहाराचे व काही घरांचेही मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीचीही रविकांत तुपकर यांनी पाहणी केली. आधीच शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबातीत मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यात पुन्हा शेतकऱ्यांवर अवकाळी संकट कोसळले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. तर त्यांच्या अर्धांगिनी ॲड. शर्वरी तुपकर यांनीही काल १२ एप्रिल रोजी मोताळा तालुक्यात ठिकठिकाणी नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर देत प्रशासनाने नुकसानीचे अहवाल शासनस्तरावर पाठवून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी केली. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाही ॲड. शर्वरी तुपकर व रविकांत तुपकर या दाम्पंत्याने प्रचार बाजुला ठेऊन शेकऱ्यांच्या बांधावर पोहचून त्यांना धीर देण्याचे काम केले, हे विशेष.