जिल्ह्यात पीक विम्यासाठी केली ४ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी! जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांची पत्रकार परिषदेत माहिती; म्हणाले, जिल्ह्याला साडेपाच लाख पिक विमा नोंदणीचे उद्दिष्ट

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शासनाने यावर्षीपासून एक रूपयात विमा काढण्याची योजना सुरू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.३१ जुलैपर्यंत पिक विमा काढण्याची मुदत आहे. तरीही आतापर्यंत चार लाख १० हजार ५७८ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. जिल्ह्यातून सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांची पिक विमासाठी नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी १९ जुलैला घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिली.
जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, गेल्या वर्षीच्या पीक विमा कंपनीचा अनुभव पाहून यावेळचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आधार, पॅन आणि बँकेची माहिती यावरून पिक विमाची कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी तीन वाहनाद्वारे प्रचार करण्यात येत आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती आणि कॉमन सर्व्हीस सेंटरवर पिक विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सर्व सरपंचांना पत्र देण्यात आले आहे.
यावर्षीच्या खरीप पिकाची परिस्थिती सध्यस्थितीतील पावसामुळे चांगली झाली आहे. जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुबार पेरणीचे संकट नसले तरी पुरेसा बियाण्यांचा साठा उपलब्ध आहे. तसेच डीएपी खताचा साठा बफर स्टॉक मोकळा करण्यात आला आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. सरासरी पावसाच्या ३० टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून यावर्षी सोयाबीन, कापूस, तूर, मका ही मुख्य पिके आहेत.
जिल्ह्यात काही ठिकाणी कपाशीवर लाल्या रोग आल्याची तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र एवढ्या लवकर कपाशीवर लाल्या रोग पडत नाही. कृषि शास्त्रज्ञांच्या मते आवश्यक अन्नद्रव्ये मिळाले नसल्याने पिकाची पाने लाल पडत आहेत. याबाबत कृषि विद्यापिठाची चमू गुरूवारी येऊन पाहणी करणार आहेत. तसेच पिकांचे नमूने नागपूर येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.