नोव्हेंबरच्या अवकाळी व गारपिटीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात! जिल्ह्यातल्या २ लाख ७६ हजार ५७५ शेतकऱ्यांना मिळणार २२० कोटी ३४ लाख!
संदीप शेळकेंनी काढलेल्या मोर्चाला आणि पाठपुराव्याला यश
Mar 23, 2024, 10:30 IST
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सिंदखेडराजा , देऊळगावराजा तालुक्यासह जिल्हाभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून शेतकऱ्यांना धीर दिला होता. शिवाय शेतकऱ्यांनी सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व शेतकऱ्यांनी केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळाली नाही तर मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेळके यांनी दिला होता. आता अखेर याचे परिणाम दिसू लागले असून सरकारने मंजूर केलेली २२० कोटी ३४ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा आज सिंदखेडराजा तालुक्यात दाखल होताच परिसरातील शेतकऱ्यांनी संदीप शेळके यांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले आहेत.
गारपीट व अवकाळी पावसाने बाधित असलेल्या जिल्ह्यातल्या २ लाख ७६ हजार ५७५ शेतकऱ्यांना ही मदत मिळत आहे. कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा व्हायला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी संदीप शेळके सर्वात आधी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले होते. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन संदीप शेळके यांनी सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता, शिवाय तातडीने मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून केली होती. मागण्यांची दखल घेत सरकारने २२० कोटी ३४ लाख रुपयांची रक्कम मंजूर केली होती.आता ही मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान सिंदखेडराजा तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी संदीप शेळके यांची भेट घेत त्यांना धन्यवाद दिले आहेत.