विठुराया फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही आपलासा वाटतो! श्र्वानालाही लागलाय भक्तीचा लळा; श्री संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत असलेल्या श्र्वानाची पंढरीपासून पालखीसोबत पायी वारी!

वारकरी म्हणतात, ही तर पुर्वजन्मीची पुण्याई...

 

मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रेड्याच्या मुखातून वेद बोलवणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्राला संतांची आणि भक्तीची मोठी परंपरा लाभली आहे. भूतदया हा वारकरी परंपरेचा गुणधर्मच..श्र्वानाने भाकरी पळवल्यानंत्तर त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावणारे संत एकनाथही याच भक्ती परंपरेतले..सर्व प्राणिमात्रांत ईश्वर आहे, माणसासारखीच ती देखील ईश्वराची लेकरे आहेत ही संतांची शिकवण..हे सगळ सांगण्याच कारण आहे, यंदाची श्री संत गजानन महाराजांची पालखी अन् त्या पालखीसोबत पंढरीपासून वारकऱ्यांसोबत पायी वारी करत भक्तिरसात तल्लीन झालेली मादी श्वान..

हो, ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मात्र ते खरं आहे. श्री संत गजानन महाराजांची पालखी उद्या ,२४ जुलैला शेगावात परतणार आहे. १६ जुलैला  पालखी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील भाविकांच्या वतीने ठिकठिकाणी जोरदार स्वागत केल्या गेले. मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार असा प्रवास करीत आज,२३ जुलैला पालखी खामगावात दाखल झाली आहे, उद्या पहाटे ४ वाजता पालखी शेगावसाठी प्रयाण करणार आहे. दरम्यान या भव्य दिव्य पालखी सोहळ्यात सगळ्या भाविकांचे लक्ष एका श्र्वानाने वेधून घेतले आहे. पालखी पंढरीतून शेगावसाठी परतीसाठी निघाली तेव्हापासून ही मादी श्वान पालखीसोबत आहे.वारीत सहभागी वारकऱ्यांची जशी दिनचर्या तशीच या श्र्वानाची आहे, त्यामुळे सगळ्यांसाठी हा कुतूहलाचा विषय बनला आहे.

  भक्तीचा लळा...

भक्तीमार्गात किती शक्ती असते हेच या मादी श्र्वानाच्या रूपाने दिसून येत आहे. संतांच्या संगतीने या श्र्वानालाही भक्तीचा लळा लागल्याचे दिसत आहे. पालखीसोबत चालणारे वारकरी देखील त्या मादी श्र्वानाला कुटुंबातील मानतात, त्यामुळे वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी श्र्वानाला देखील मायेने जेवू घालतात.  प्रवासात ठिकठिकाणी बिस्कीट, दूध देऊन वारकरी श्र्वानाची सेवा करतात. श्वानदेखील पालखीच्या पूर्ण शिस्तीचे पालन करून चालत असल्याचे वारकऱ्यांनी सांगितले. श्वान जन्मात देखील भक्तीमार्गाचा लळा लागणे म्हणजे काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई असेल अशा भावना वारकरी व्यक्त करीत आहेत. या श्र्वानाला पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहे.