Amazon Ad

मायबाप शेतकरी उपाशी, सत्ताधारी तुपाशी! जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ९७० शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पिक विम्याची प्रतीक्षा!

 
बुलडाणा (अक्षय थिगळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अस्मानी व सुलतानी संकटाशी झुंज देवून जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी यंदा कशी बशी पेरणी उरकली. मागील वर्षाच्या खरीप हंगामातील पिक विम्याचे कोट्यावधी रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नसल्याचे भीषण चित्र आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ९७० शेतकरी २०२३-२४ च्या खरीप हंगामातील पिक विमा रकमेपासून वंचित आहेत. आजवर ६७ हजार ८७४ शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळाले असून, एक लाख ६९ हजार ९०७ शेतकऱ्यांना १०१.४६ कोटींचा पिक विमा अजूनही प्रलंबित आहे. 
    खरीप हंगामातील विविध पिकांचे मागील वर्षी अतोनात नुकसान झाले होते. अस्मानी संकटापुढे हरभरा, गहू, मका अशी पिके जमीनदोस्त झाली होती. २०२३ - २४ अंतर्गत खरीप हंगामातील पीक विम्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार १३७ शेतकऱ्यांनी ३ लाख ६ हजार ७३६ इतके अर्ज केले होते. यापैकी, ६४ हजार ३६७ शेतकऱ्यांनाच १३२.७४ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली. बाकीचे ५५ हजार ८५ शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई वितरित करणे बाकी आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदने दिली. प्रलंबित पिक विमा तातडीने मिळावा अशी मागणी अजूनही होत आहे.