बुलडाणा जिल्ह्यात "मुन्नाभाईंचा" सुळसुळाट! ८०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टर? आरोग्य विभागाकडून झोपेचे सोंग; पोलिसांनी नांदुऱ्यात पकडला एक मुन्नाभाई! रुग्णांना हॉटेलात बोलावून करायचा.....

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात मुन्नाभाई अर्थात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुटलाय. कोणतीही अधिकृत पदवी नसलेले अनेक भामटे वैद्यकीय व्यवसायात उतरले असून काहींनी तर दवाखाने देखील थाटले आहेत. याची खबर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला नाही असे नाही मात्र "पैसो मे सब बिक गये" अशी स्थिती आहे. आरोग्य विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने नांदऱ्यात पोलीस विभागाने एक बोगस डॉक्टर पकडला. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाने शेख युसुफ शेख शौकत याच्यावर कारवाई केली. 
प्राप्त माहितीनुसार स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणारा शेख युसुफ शेख शौकत ( रा. अंबिकापूर चितोडा, ता.खामगाव) याच्याकडे वैद्यकीय शास्त्रातील कोणतीही डिग्री नाही. असे असताना नांदुरा येथील हॉटेल दिपक मध्ये तो रुग्णांना बोलवायचा, भुकटी आणि द्रवस्वरूपातील औषध तो रुग्णांना देत या औषधाने तुमचा आजार बरा होईल असा दावा करायचा आणि गोरगरीब रुग्णांकडून पैसे उकळायचा.
  ही खबर गोपनीय सूत्रांकडून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना कळली. त्यांनी पथकाला आदेश देत सापळा रचला. या सापळ्यात बोगस मुन्नाभाई शेख युसुफ अलगद अडकला. त्याच्याकडून भुकटी स्वरूपातील ६४ हजार रुपयांची औषधी आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून त्याच्याविरोधात नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..
  आरोग्य विभागाने घेतले झोपेचे सोंग..जिल्ह्यात ८०० च्या वर बोगस डॉक्टर..!
  बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ८०० पेक्षा अधिक बोगस डॉक्टर असल्याची खात्रीलायक माहिती आहे. एकट्या चिखली तालुक्यात १०० पेक्षा अधिक बोगस डॉक्टर आहे. ह्या भामट्यांनी कधीतरी एखाद्या डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम केलेले असते. थोडीपार अक्कल आली म्हणून या भामट्यांनी स्वतःच्या नावासमोर चक्क डॉक्टर लावणे सुरू केले. विशेष म्हणजे मेडिकल मधून स्वस्त दरात एकत्रित औषधी खरेदी करून रुग्णांना चढ्या दराने विक्री करण्याचा धंदा देखील बोगस भामट्या डॉक्टरांनी सुरू केला आहे. गावोगावी हिंडणारे हे बोगस भामटे डॉक्टर अल्पज्ञानी आहेत.त्यामुळे अनेक रुग्णांना यांच्याकडून धोका होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी आरोग्य विभागाचे अधिकारी गप्प आहेत.. त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे..!