ज्येष्ठा गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या! "या" वेळेतच करा ज्येष्ठा गौरी आवाहन; दुपारी "या" वेळेत आहे राहू त्यामुळे त्या वेळेत आवाहन टाळा! जाणून घ्या संपूर्ण शुभ मुहूर्त...
Sep 21, 2023, 08:15 IST
बुलडाणा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): मंगळवारी घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. आज,२१ सप्टेंबरला गौराईंचे आगमन होत आहे. गणपती उत्सवाचे १० दिवस आणि गौराईंचे ३ दिवस हे घरोघरी अतिशय उत्साहात साजरे होतात. श्री गणेश पूजन आणि गौरीपूजन विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास त्याचे अधिक चांगले फळ मिळते अशी मान्यता आहे.
ज्योतिषशास्त्राने आज गौरी आगमनाचे शुभ मुहूर्त सांगितले आहेत. भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील षष्ठीला,अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होत असते. काल,म्हणजेच २० सप्टेंबर बुधवारी दुपारी २ वाजून ५८ मिनिटांनी अनुराधा नक्षत्राला सुरुवात झाली असून आज,२१ सप्टेंबरच्या दुपारी ३ वाजून ३४ मिनिटापर्यंत अनुराधा नक्षत्र आहे. याचाच अर्थ ३ वाजून ३४ मिनिटांच्या आधीच गौरींचे आगमन करायचे आहे. मात्र त्यातही एक वेळ टाळायची आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार गौरी आगमनासाठी दोन शुभ मुहूर्त देण्यात आले आहेत. आज २१ सप्टेंबरच्या सूर्योदयानंतर ७ वाजून ४६ मिनिटांपासून तर दुपारी १ वाजून ४४ मिनिटापर्यंत पहिला शुभ मुहूर्त आहे. तर दुसरा शुभ मुहूर्त ३ वाजून १६ मिनिटांपासून तर ३ वाजून ३४ मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर गौराई आगमन करावे. दुपारी १ वाजून ४५ ते ३ वाजून १५ मिनिटे या काळात राहू काळ असल्याने या वेळेत गौरी आगमन करू नये.