विजेच्या कडकटासह रातभर धो धो बरसला पाऊस; कुठे शेतकरी सुखावला तर कुठे दुखावला, खामगाव तालुक्यात वीज कोसळल्याने दोन बैल ठार ! कांदा शेडला लागली आग, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान...

 
खामगाव (भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) काल सायंकाळी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. खामगाव, बुलढाणा भागात रात्री पावसाचा जोर वाढला. विजेच्या कडकटासह रात्रभर धो धो पाऊस बरसला. दरम्यान, मशागतीची कामे पूर्ण केल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. परंतु काही ठिकाणी वीज कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात वीज कोसळून दोन बैले ठार झाली. तर दुसरीकडे चितोडा येथे जोरदार विजेमुळे कांदा शेडला आग लागली. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. 
खामगाव तालुक्यात काल सायंकाळी ५:३० वाजेनंतर पावसाची सुरुवात झाली. आधी मध्यम स्वरूपात बरसणाऱ्याने पावसाने नंतर जोर धरला. जोरदार विजा कडाडल्या. दरम्यान, बोरी आडगाव येथील शेतकरी शेख मुमताज शेख बुढन (६६ वर्ष) यांनी शेतातील झाडाला आपली दोन बैले बांधली होती. बैलांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाले. ऐन पेरणी पाण्याच्या लगबगीत त्यांचे प्रचंड नुकसान झाले. दुसऱ्या घटनेत, चितोडा येथील किसन हिवराळे यांच्या कांदा शेडला वीज पडून आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. 
  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे जवळपास आटोपली होती. त्यानंतर पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र काल झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला. परंतु काही ठिकाणी वीज कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले आहे.