रातभर धो धो बरसला! जिल्ह्यात प्रचंड गारपीट! गहू, हरभरा,फळबागा जमीनदोस्त. शेतकऱ्यांसमोर पुन्हा अस्मानी संकट!

 
Gar
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) हवामान विभागाने वर्तवलेला अंदाजानुसार काल २६ फेब्रुवारीच्या रात्री जिल्ह्यात प्रचंड गारपीटीसह मुसळधार पाऊस पडला. मलकापूर, लोणार, संग्रामपूर, शेगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ही पिके जमीनदोस्त झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांसमोर आस्मानी संकट उभे ठाकले आहे.
  लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू, बीबी,देवानगर, गोवर्धन नगर या भागात जोरदार पावसासह गारपीट झाली. किनगाव राजा परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.तर सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, दुसरबिड, या भागातही गारपीट झाली, तसेच शेगाव तालुक्यातील भोनगावात जवळपास एका तासापेक्षा अधिक वेळेत गारपीट झाल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे . त्यामध्ये शेकडो क्विंटल हरभऱ्याची पोते भिजली या ठिकाणी जोरदार वादळ वारा पाहायला मिळाला त्यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. 
शेतकरी म्हणतात..
आता दुसऱ्यांदा जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. मोठी गारपीट झाली त्यामुळे नेहमीप्रमाणे शेतकरी अडचणीतच आहे. आता तरी शासनाने गंभीर दखल घेऊन मदत जाहीर करावी, विशेष म्हणजे बुलडाण्यात यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पीक लागवडीच्या वेळी पैशाअभावी अडचण झाली. कारण मागील वर्षाची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई ची मदत तात्काळ मंजूर करून खात्यात जमा केली पाहिजे - अभय गाडेकर शेतकरी