विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! क्रीडा गुण सवलत पाहिजे? मग २० मार्चच्या आधी करा "हे" काम
Updated: Mar 4, 2024, 08:36 IST
बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त संपादन केलेले, तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेले, सहभागी झालेले खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येते. त्यानुसार संबंधीत शाळा, खेळाडूंनी दि. २० मार्च २०२४ पूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन, सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव, विहीत नमुन्यात अर्ज, हॉल तिकीट, संबंधित खेळाचे प्रमाणपत्र, शालेय परिशिष्ठ ई, तसेच विविधस्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन, सहभागी असल्यास, राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर असे क्रमवार प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. प्रत्येक पृष्ठ मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. सदर अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.
सेवा हमी कायद्यानुसार ग्रेस गुण देण्याकरीता ऑनलाईन पोर्टल सिस्टीम schooleducation.mahaonline.gov.in कार्यरत आहे. राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेले, सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण सदरच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी, खेळाडूंनी प्रथम नोंदणी करुन क्रीडागुण सवलतीचा अर्ज, परिक्षेचे हॉल तिकीट आणि खेळाचे प्रमाणपत्र यासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. सदरच्या प्रस्तावाची हार्डकॉपी २ प्रतीमध्ये सादर करावी लागणार आहे. क्रीडा स्पर्धा एकविध खेळ संघटनांद्वारे आयोजित केले असल्यास संघटना परिशिष्ट-१० सोबत, विहित नमुन्यात अर्ज, हॉल तिकीट, मान्यताप्राप्त खेळाचे प्रमाणपत्र, शालेय परिशिष्ठ-ई आदीसह संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी खेळाडूंचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे लागणार आहे.
एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांनी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे अहवाल dsobld@gmail.com या ई-मेलवर पाठवावे लागणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.