शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी मिळणार दीड लाख रुपये! अर्ज कसा करायचा, कुणाला भेटायचे? बातमीत वाचा... ​​​​​​​

 
fgf

बुलडाणा(जिल्हा माहिती कार्यालय): मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात योजनेतून आतापर्यंत ६२ शेततळे पूर्ण झाले आहेत. सध्याच्या पावसाच्या खंड काळात शेततळ्यामध्ये जमा झालेल्या पाण्याचा खरीप पिके, फळबागांच्या संरक्षित सिंचनासाठी उपयोग होत आहे. या योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी पूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे यासह इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसणे आवश्यक आहे.

सध्याची पाणीटंचाईची परिस्थिती पाहता भविष्यात फळबाग वाचवण्यासाठी सध्या उपलब्ध असलेली विहीर आणि बोअरवेलचे, तसेच परतीच्या पावसाद्वारे उपलब्ध होणारे पाणी अस्तरीकरणासह शेततळे योजनेचा लाभ घेऊन साठवणे गरजेचे आहे. या योजनेतून अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत आणि अस्तरीकरणासह शेततळ्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. काम पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान जमा करण्यात येते.

शेततळे योजनेतून संरक्षित सिंचन शेतीला मिळावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी शेततळ्याचा लाभ घेतलेला नसलेल्या जिल्ह्यातील फळबागधारक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर सीएससी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरित्या ऑनलाईन नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.