शेतकऱ्यांनो, ३० जूनपूर्वी पीककर्जाचे नूतनीकरण करा! नाहीतर "या" फायद्यापासून वंचित रहायची वेळ येईल...

 

बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येत्या खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि बँकेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्यासाठी त्यांनी ३० जूनपूर्वी पीककर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह.पि. तुम्मोड यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक डॉ. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. डॉ. तुम्मोड म्हणाले, यावर्षी एक हजार ४७० कोटी रुपयांचे उद्दीष्ट असले तरी आतापर्यंत ६०४ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. यात कर्ज नुतनीकरणात अर्ज येत असल्यास येत्या ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पीककर्ज नुतनीकरणाची कामे प्राधान्याने हाती घ्यावी. नूतनीकरण केल्यास केंद्र आणि राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. अन्यथा त्यापासून वंचित रहावे लागू शकते.  ३० जूनपूर्वी कर्ज नूतनीकरण केल्यास तीन लाखापर्यंतच्या कर्जाला शून्य व्याजदर लागत असल्याने १० टक्के वाढीव कर्ज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्राधान्याने पिककर्जाचे नूतनीकरण करावे, असे आवाहन केले. 

यात आर्थिक वर्ष २०२२-२३ चा प्रगती अहवाल अग्रणी जिल्हा प्रबंधक नरेश हेडाऊ यांनी सादर केला. मागील वर्षीचा जिल्ह्याचा पत आराखडा चार हजार ३५० कोटी रुपयांचा होता. त्यानुसार जिल्ह्यातील बँकांनी सात हजार ६६७ कोटी रुपयांचा पतपुरवठा केला आहे. उद्दिष्टापेक्षा १७७ टक्के कर्ज वाटप जिल्ह्यात करण्यात आले आहे. यात प्राथमिकता प्राप्त क्षेत्रामध्ये ४ हजार ९५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून ५ हजार ८६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच कृषि क्षेत्रामध्ये २ हजार ७०० कोटी उद्दिष्टाच्या ३ हजार ६५७ कोटींचे वाटप करण्यात आल्याचे हेडाऊ यांनी सांगितले.