जिल्हा बँकेने एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न करावे; जिल्हाधिकारी डॉ तुम्मोड यांचा जिल्हा बँकेला सल्ला; जिल्हा बँकेच्या मोबाईल एटीएम सेवेस सुरवात; आता गावागावात येणार जिल्हा बँकेची व्हॅन.. ​​​​​​​

 
h

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा बँक ही सर्वसामान्य नागरिकांची बँक आहे. बँक करीत असलेल्या विविध उपक्रमामुळे भविष्य उज्ज्वल आहे. पुरेशी यंत्रणा हाती असली तरी अडचणी या प्रत्येकाला येतात. मात्र या अडचणीवर मात करून गौरवास्पद कामगिरी करण्याची संधी बँकेकडे आहे. सध्या असलेला एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केली.

दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने नाबार्डच्या अर्थसहाय्याने सुरु केलेल्या मोबाईल व्हॅनमधील एटीएम सेवेची सुरवात  १४जुलै २०२३ रोजी जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांचे हस्ते करण्यात आली.

सदर मोबाईल एटीएम व्हॅन ही जिल्ह्यातील एकमेव मोबाईल एटीएम व्हॅन आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील ग्रामीण भाग, एटीएम सुविधा उपलब्ध नसलेले शहरी भाग, तसेच आठवडी बाजाराचे ठिकाणी एटीएम सेवा उपलब्ध करून देणार आहे. मोबाईल एटीएम व्हॅन ही जिल्हा सहकारी बँकेची एक परीपूर्ण शाखा म्हणून कार्य करणार आहे. याद्वारे जिल्हा बँकेचे खातेदार आपले सर्वप्रकारचे व्यवहार करू शकतील. तसेच कुठल्याही बँकेचे कार्डद्वारे एटीएममधून व्यवहार करू शकतील. यासोबतच मोबाईल एटीएम व्हॅनचा उपयोग खास करून ग्रामीण भागामध्ये आर्थिक व डिजीटल साक्षरता प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी बँक करीत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच बँकेचा एनपीए कमी करून बँक सुस्थितीत येण्यासाठी उपयुक्त सुचना देऊन बँकेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपनिबंधक तथा प्राधिकृत अधिकारी समिती अध्यक्ष संगमेश्वर बदनाळे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री. गाढे,  जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक नरेश हेडाऊ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, मुख्य व्यवस्थापक मनिष ठाकरे, एकनाथ गाढे, सोमीनाथ इथापे आदी उपस्थित होते.