मोठी बातमी! रविकांत तुपकरांची वाणिज्य मंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक; सोयाबीन कापसाच्या भाववाढीसंदर्भात केंद्र सरकार तातडीने पावले उचलणार!

वाणिज्य मंत्र्यांचा तुपकरांना शब्द; पाम तेलावरील आयात शुल्क वाढवणार, सोयापेंड आयात करणार नाही, निर्यातीसाठी प्रयत्न करणार! बैठकीत काय काय झालं...वाचा...
 
Rt
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सोयाबीन कापसाच्या प्रश्नांसंदर्भात वाणिज्य मंत्र्यासोबतची बैठक तब्बल दीड तास चालली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. बैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलतांना बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. सोयाबीनच्या दरवाढी संदर्भात वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचा शब्द वाणिज्य मंत्र्यांनी दिल्याचे तुपकर यांनी सांगितले.
सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केंद्र सरकार करणार आहे. पाम तेलावरील आयात शुल्क वाढवणे, सोयापेंड निर्यातीसाठी तातडीने पावले उचलणे आणि सोयापेंड आयात न करणे यासंदर्भात केंद्र सरकार सोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे तुपकर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या वतीने वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी धोरणात्मक बदल करण्यास सकारात्मकता दाखवली आहे, याची अंमलबजावणी झाल्यास सोयाबीनचे दर वाढतील असे तुपकर म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती वाणिज्य मंत्र्यांना अवगत करून देत तूपकरांच्या बाजूने सोयाबीन कापसाच्या दरवाढीचा विषय रेटला.
  कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात पडलेले आहेत, त्यामुळे कापसाच्या दरवाढीसाठी काय करता येईल यासाठी केंद्रीय कृषी मंत्री, संबधित खात्यांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ती पावले उचलू असे वाणिज्य मंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
  यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांना देखील हात घालत शेतकऱ्यांच्या समस्या सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या. ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि तुर पिकाचे मोठे नुकसान झाले, फुलगळ झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे त्यामुळे या नुकसानीचे देखील पंचनामे करण्याची मागणी तुपकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर घसरले आहेत, त्यामुळे कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याची मागणी तुपकर यांनी केली. दूध भुकटी निर्यातीसाठी अनुद्यान द्यावे, इथेनॉल निर्मितीवर बंदी असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे,त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर बंदी उठवावी अशी आग्रही मागणी तुपकरांनी बैठकीत केली. यावर सरकारने सकारात्मकता दर्शवली. सोयाबीन कापसाच्या संदर्भात केंद्र सरकारने अभ्यासगट स्थापन करावा, त्याची वर्षातून दोनदा बैठक व्हावी असा विषय तुपकर यांनी बैठकीत वाणिज्य मंत्र्यासमोर मांडला.