शेती- कामे रखडणार! तलाठी आजपासून सामूहिक रजेवर!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विविध मागण्यांसाठी विदर्भ पटवारी संघाच्या बुलढाणा जिल्हा शाखेने १८ जुलैपासून आंदोलन छेडले आहे. आंदोलनांचे विविध टप्पे पार केल्यानंतर आज २९ जुलैपासून तलाठी, मंडळ अधिकारी सामूहिक रजा आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजेंद्रकुमार धोंडगे यांनी दिली.
  १८ जुलैला काळ्या फिती लावून कामकाज, २३ जुलै रोजी तहसील कार्यालयांसमोर धरणे, २५ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि २६ जुलै रोजी डीएससी म्हणजे डिजिटल सिग्नीचर तहसील कार्यालयाकडे जमा करण्यात आल्या. आता २९ जुलैपासून सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. ५२३ तलाठी आणि ९० मंडळ अधिकारी असे ५१३ कर्मचारी रजेवर असल्याने तलाठीस्तरावरील महसुली कामांचा खोळंबा होणार आहे. प्रस्तावित तलाठी संवर्गाच्या बदलीचा अन्यायकारक प्रस्ताव मागे घ्यावा, नियतकालिक बदलीस पात्र तलाठ्यांची समुपदेशानाद्वारे बदली करावी, कौटुंबिक, वैद्यकीय किंवा व्यक्तिगत अडचणीमुळे विनंती बदलीस इच्छूक तलाठ्यांची विनंती व आपसी बदली करावी, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.