खेडेकरांच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला "हे" माहिती नसेल! अल्पभूधारक आहेत नरेंद्र खेडेकर!

भूमिहीन असल्याचा डाग पुसण्यासाठी घेतली होती दीड एकर शेती! खेडेकरांकडे किती संपत्ती ? किती दागिने, कॅश किती? वाचा...
 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज जंगी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रोहित पवार , विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे, यांच्यासह महाविकासआघाडीचे जवळपास सर्वच नेते यावेळी उपस्थित होते. अर्ज दाखल करतेवेळी नरेंद्र खेडेकर यांनी निवडणूक आयोगाकडे शपथपत्र सादर केले. या शपथपत्रात त्यांनी त्यांच्याकडे असलेली एकूण संपत्ती,शेती, वाहने, शिक्षण, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे याबद्दलची माहिती दिली आहे. नरेंद्र खेडेकर यांच्याकडे केवळ ५५ गुंठे शेती आहे, ती शेलुद शिवारात आहे. खेडेकर यांच्या पत्नी सौ.अर्चना खेडेकर यांच्या नावावर शेती नाही व कोणताही प्लॉट नाही. नरेंद्र खेडेकर व त्यांच्या पत्नी सौ.खेडेकर यांच्याकडे एकूण ४ कोटी ४७ लाख ४० हजार ८७ रुपयांची संपत्ती असल्याचे शपथपत्रात नमूद आहे.
  Advt
Advt.👆
नरेंद्र खेडेकर यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार खेडकर यांनी विद्युत अभियांत्रिकिमध्ये डिप्लोमा (१०+२) केलेला आहे. अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात १९८३ला खेडेकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. खेडेकर यांच्याकडे आज ४ एप्रिलच्या तारखेत ५५ हजार ८०० रुपये कॅश स्वरूपात आहेत तर त्यांच्या पत्नीकडे ४८ हजार ५०० रुपये आहेत. 
  एसबीआयच्या चिखली शाखेत खेडेकर यांचे बचत खाते आहे, त्यात १२ लाख १९ हजार ४३५ जमा रुपये आहेत. याच बँकेत त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे संयुक्त बचत खाते आहे त्यात ६ लाख ९८ हजार ७५९ रुपये आहेत. एसबीआय बँकेत ४४ लाख रुपये आणि २२ लाख लाख रुपये त्यांनी मुदत ठेवीत गुंतवले आहेत. सौ.अर्चना खेडेकर यांनी देखील एसबीआय बँकेत ३४ लाख रुपये मुदत ठेवीत गुंतवले आहेत. त्यांच्या एसबीआयच्या बचत खात्यात १८ हजार ८३४ रुपये आहेत. खेडेकर यांनी एलआयसी पॉलिसी ५ लाख, एसबीसाय पॉलिसी मध्ये २४ लाख रुपये गुंतवले आहेत.
२४ लाख रुपयांचे दागिने...
Advt
Advt.👆
नरेंद्र खेडेकर यांच्याकडे १ टोयाटो कंपनीची फॉर्च्यूनर गाडी आहे, ती त्यांनी २०२१ मध्ये ४५ लाख रुपयांना खरेदी केली आहे. नरेंद्र खेडेकर यांच्याकडे कोणतेही दागिने नाहीत.खेडेकर यांच्या पत्नी सौ अर्चनाताई यांच्याकडे सोन्याची रिंग, बांगडी, पोत असे ४०० ग्रॅम दागिने आहेत, त्याचे मूल्य २४ लाख रुपये आहे.
भूमिहीन डाग पुसला जावा म्हणून...
नरेंद्र खेडेकर यांचे वडील पोलीस शिपाई होते. त्यांच्याकडे शेती नव्हती. भूमिहीन असल्याचा डाग पुसण्यासाठी त्यांनी १९९७ मध्ये चिखलीत ९० हजार रुपयांत ५५ गुंठे शेती शेती खरेदी केली, त्या शेतीची आजघडीला किंमत ३० लाख रुपये आहे. त्यानंतर नरेंद्र खेडेकर यांनी कुठेही शेती खरेदी केली नाही. सौ.अर्चनाताई खेडेकर यांच्या नावावर देखील कुठेही शेती नाही.
खेडेकर यांच्याकडे शेलुद शिवारात प्लॉट आहे. तो त्यांनी २०११ मध्ये खरेदी केला होता.त्याची किंमत आता १२ लाख रुपये आहे. याशिवाय खेडेकर यांच्याकडे चिखली शहरात ३ ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी गाळे आहेत. सध्या नरेंद्र खेडेकर राहतात ते चिखली शहरातील खामगाव चौफुली वरील घराची जागा त्यांनी २००७ मध्ये ३ लाख ५७ हजार रुपयांत खरेदी केली होती.त्यावर त्यांनी ४० लाख रुपयांचे बांधकाम केले. ४ हजार ७४५ चौरस फूट जागेवर बांधलेल्या या घराची आजघडीला किंमत १ कोटी रुपये आहे. खेडेकर यांची जंगम मालमत्ता १ कोटी ५९ लाख ७३ हजार ९९४ रुपयांची, सौ.अर्चनाताई यांची जंगम मालमत्ता ७० लाख ६६ हजार ९३ रुपयांची तर नरेंद्र खेडेकर यांची स्थावर मालमत्ता २ कोटी १७ रुपयांची संपत्ती आहे. सौ.अर्चनाताई यांच्या नावावर कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. 
खेडेकरांच्या उत्पन्नाचे साधन काय?
नरेंद्र खेडेकर श्री शिवाजी सीनियर कॉलेज येथे एमसीव्हीसी विषयाचे प्राध्यापक होते. २०१९ मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. शेती सेवानिवृत्तीमधून मिळणारे वेतन आणि मुदत ठेवीतून मिळणारे व्याज हे आपल्या उत्पन्नाचे साधन असल्याचे नरेंद्र खेडेकर यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. खेडेकर यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे, कोरोना काळात दाखल असलेला हा गुन्हा आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आहे. विशेष म्हणजे खेडेकर आणि त्यांच्या पत्नी सौ.अर्चनाताई यांच्यावर एक रुपयाचे देखील कर्ज नाही..