काल जळगाव जामोद आज लोणार सुलतानपूर गाजवले! संदीप शेळकेंचा झंझावाती प्रचार; म्हणाले, ५ वर्षात जिल्ह्याचा कायापालट करून दाखवतो...
Apr 13, 2024, 18:42 IST
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. संतनगरी शेगावातून रोड शो करून प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर संदीप शेळके आता लोणार तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज,१३ एप्रिलला लोणार शहर, सुलतानपूर येथे संदीप शेळके यांच्या रोडशो ला दमदार प्रतिसाद मिळाला. पुढच्या पाच वर्षात जिल्ह्याचा कायापालट करून दाखवतो असा शब्द शेळकेंनी दिला.
संदीप शेळके अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कुठलाही पक्ष नसतांना, कुठलाही राजकीय गॉडफादर नसतांना संदीप शेळके यांची प्रचारयंत्रणा जबरदस्त आहे. ६ विधानसभा क्षेत्रात त्यांच्या प्रचारकार्यालयांचे उद्घाटन झाले आहे. बुलडाणा शहरातील वन बुलडाणा मिशनच्या वॉर रूम मधून शेळके यांच्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन होत आहे.
५ वर्षात जिल्ह्याचा कायापालट करून दाखवतो...
आजही जिल्ह्याला मागासलेपणाचा कलंक आहे. प्रस्थापितांनी आजवर विकासासाठी कुठलीही ठोस भूमिका घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळेच राजकारणात येण्याचा विचार करून जिल्ह्याचा विकास करण्याचे ध्येय बाळगून निवडणूक लढतो आहे. जनतेने संधी दिली तर पुढच्या पाच वर्षात जिल्ह्याचा कायापालट करून दाखवेल असे संदीप शेळके म्हणाले.