Amazon Ad

होय! मतदारांनो, अपक्षही निवडून येऊ शकतो! विधानसभेत ४ अपक्ष झालेत विजयी; यंदा लोकसभेत सुद्धा होऊ शकतो चमत्कार..! वाचा कसा आहे इतिहास...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा शेतकरी नेते तथा अपक्ष रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा रंगली आहे. ते विजयाच्या शर्यतीत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा मतदारसंघात आजवर न घडलेला निवडणुकीय चमत्कार होऊ शकतो काय? असा राजकीय प्रश्न ऐरणीवर आला आहे. सन १९५७ ते २०१९ दरम्यान बुलढाण्यात झालेल्या लढतीत एकाही अपक्ष उमेदवाराला विजय मिळविता आला नाहीये! चांगले अपक्ष रिंगणात असूनही आजवर मतदारांनी त्यांना पाठबळ देण्याचे टाळले. यंदाच्या निवडणुकीत हा चुकीचा व अपक्षावर अन्याय करणारा विक्रम मोडीत निघणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. रिंगणातील प्रबळ अपक्ष रविकांत तुपकर याना मतदारसंघात मिळणारा उत्साही प्रतिसाद लक्षात घेता यंदा त्यांना हा विक्रम करण्याची मोठी संधी असल्याचे मानले जात आहे. 
  आजवरच्या बुलढाणा लोकसभेच्या लढायांत पक्षीय उमेदवारांनाच मतदारांनी कौल दिल्याचा इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारराजाने प्रबळ अपक्षांना विजयी केल्याचे अनेक दाखले आहेत. रिंगणातील काँग्रेस, भाजप, शिवसेना, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी सारख्या पक्षाना डावलून सक्षम अपक्ष उमेदवाराला मतदारांनी संधी दिली आहे. १९८० ते २०१९ दरम्यान झालेल्या लढतीत चार अपक्ष निवडून आले आहे. या अपक्षानी पुढे राजकीय क्षेत्रात दमदार कामगिरी करीत आपल्या मतदारसंघाच्या विकासात भर घातल्याचा सुखद इतिहास आहे. अपक्ष म्हणजे एका लढतीपुरते मर्यादित नेते हा मतदारांचा
प्रचंड गैरसमज या अपक्षांनी साफ चुकीचा ठरविला. यातील सर्वच नेते आजही राजकारणात सक्रिय असून जिल्हाच नव्हे राज्यातील राजकारणातही गाजले व गाजत आहे. 
 
हे आहेत 'ते अपक्षवीर'!
 राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील प्रमुख नेते असलेले आमदार राजेंद्र शिंगणे यांची राजकीय सुरुवातच अपक्ष आमदार म्हणून झाली. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात त्यांनी १९९५ मध्ये अपक्ष म्हणून लढत दिली आणि ७१ हजार ९४१ मते घेत काँग्रेसचे तोताराम कायंदे( ३९, ६१३) यांना धूळ चारली. यानंतर २०१४ वगळता सर्वच लढतीत त्यांनी राष्ट्रवादी तर्फे लढत विजय मिळविला. जिल्हा बँकेला मदतीच्या मुद्दयावरून २०१४ ची निवडणूक त्यांनी लढविली नाही. त्यांनी विविध खात्यांचे मंत्री, बुलढाण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. यामुळे एखाद्या अपक्षाची देखील काय ताकद असू शकते हे त्यांनी सिद्ध केले. याच मतदारसंघातून १९९० मध्ये तोताराम कायंदे यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. ते आजही राजकारणात सक्रिय आहे. मेहकर मतदारसंघात सुबोध सावजी या दिग्गज नेत्याने १९८५ मध्ये काँग्रेसचे रुपराव रहाटे याना अपक्ष म्हणून पराभूत केले होते. १९९० मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविताना आताचे खासदार प्रतापराव जाधव यांना पराभूत केले होते.त्याना पुढे राज्यमंत्री पद, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. आजही ते राजकारणात ताकदीने कार्यरत आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांनी मलकापूर मतदारसंघातून पहिला विजय अपक्ष म्हणून मिळविला. त्यानंतर भाजपचे आमदार म्हणून सलग विजय मिळविले. 
 
मतदारांनो, अपक्षही चमत्कार करू शकतो
 ही राजकीय उदाहरणे म्हणजे, अपक्षही मोठ्या निवडणूक लढू शकतो, जिंकू शकतो. मोठा नेता होऊ शकतो हे सिद्ध करणारी आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभेतील प्रबळ अपक्ष रविकांत तुपकर का जिंकू शकत नाही? असा सवाल तुपकरांचे हजारो समर्थक करीत आहे. हा युक्तिवाद करताना वरील नेत्यांची उदाहरणे देत आहे. त्यामुळे पायाखालची वाळू घसरत असलेले विरोधक निरुत्तर होत असल्याचे दिसून येत आहे.