बुलडाण्यात यशोमती ठाकूरांची पत्रकार परिषद! म्हणाल्या, जेल मध्ये जायची वेळ आली तरी मागे हटणार नाही,देशात हिटलरशाही सुरू झाल्याचा केला आरोप

 
press
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  देशातून लोकशाही लुप्त होईल का याची भीती आता जनसामान्यांना वाटू लागली आहे. कुठेच चर्चेत नसलेली एक केस एकाएकी चर्चेत येते आणि त्याचा निकाल लागून दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींची खासदारकी रद्द होते, याला हिटलरशाही नाही तर आणखी काय म्हणायचे? जे सध्या राहुल गांधींसोबत झाले ते देशातील कुणासोबतही होऊ शकते. सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकासोबत हे होऊ शकते, कारण आता देशात हिटलरशाही सुरू झाली आहे. मात्र आम्ही याविरोधात आवाज उठवणार ,रस्त्यावर उतरणार, जेल मध्ये जायची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही असे प्रतिपादन काँग्रेसच्या नेत्या, जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. बुलडाणा येथे आयोजित जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ, आमदार राजेश एकडे, आमदार धिरज लिंगाडे, श्याम उमाळकर ज्ञानेश्वर पाटील, विजय अंभोरे उपस्थित होते.
 

 पुढे बोलतांना यशोमती ठाकूर म्हणाल्या की,संविधानाने दिलेले बोलण्याचे स्वातंत्र्य देखील आता हिरावून घेतल्या जात आहे. राहुल गांधींनी ७ फेब्रुवारीला संसदेत अदानी घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारले, मात्र या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी, उत्तरे देण्याऐवजी राहुल गांधी ,मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाचा भागच संसदीय कामकाजातून वगळण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती गठीत करण्याची आमची मागणी आहे. मात्र आमच्या मागणीमुळे मोदी घाबरले आहेत. अदानीला वाचवण्यासाठी ते सर्व शक्ती पणाला लावत असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या. अदानी आणि पंतप्रधानांचे नाते आहे तरी काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  संसदेच्या सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिल्या जात नाही, विधान सभेतही आमचे माईक बंद केले जातात..एवढं होत असेल तर सत्य कशाच्या भरोश्यावर आम्ही लोकांपर्यंत पोहचवायचे असेही त्या म्हणाल्या. देशात काँग्रेसने आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे, आम्ही रस्त्यावर उतरून भाजपचे कारनामे लोकांना सांगणार आहोत..आम्ही घाबरणार नाही,आम्ही चूप बसणार नाही, आम्ही प्रश्न विचारणारच. आम्हाला जेल मध्ये जायची वेळ आली तरी मागे हटणार नाही असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
   
तुमच्याच राज्यात हिंदू कसे खतरे मे?

   सध्या देशात भाजपचे राज्य आहे. राज्यात शिंदे फडणविसांचे सरकार आहे. तरीही ते हिंदू खतरे मे है असे नारे देतात..तुमच्याच राज्यात हिंदू खतरे मे असतील तर तुम्ही काय गोट्या खेळता का असा सवाल त्यांनी भाजपला केला.