बुलढाण्यात ४ व ५ नोव्हेंबरला जागतिक धम्म परिषद! परिषदेच्या नियोजनाची तयारी सुरू; सतीश पवार यांची माहिती

 
Sp

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मूकनायक फाऊंडेशन व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहरात ४ व ५ नोव्हेंबर रोजी जागतिक भव्य धम्म परिषद व बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मूकनायक फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश पवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

ही धम्म परिषद सतीश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी बुद्ध आणि त्यांचा धम्म व बौद्ध साहित्य चळवळ यांच्याशी निगडित साहित्यिकांना तर दुसऱ्या दिवशी जागतिक कीर्तीप्राप्त बौद्ध भिक्खूंना आमंत्रित करण्यात आले आहे. धम्म परिषदेच्या दोन्ही दिवसांमध्ये नवतरुण, सुशिक्षित बेरोजगार तथा उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी उपयुक्त ठरेल असा बिझनेस एक्स्पो घेतला जाणार आहे.

यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये तरुणांना व्यवसाय करण्यासाठी असलेल्या संधीची माहिती देण्यात येणार आहे. तसेच यामध्ये विविध महामंडळे, बँकांचादेखील कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत.

धम्म परिषदेचे दोन्ही दिवस विविध क्षेत्रातील खासगी व सरकारी आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहून सुशिक्षित बेरोजगारांना मार्गदर्शन करतील. सर्व क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार व बौद्ध धम्म बांधवांनी परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.