महिला आयोग आपल्या दारी’चे शुक्रवारी बुलडाण्यात आयोजन! राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर येणार; जिल्हाभरातील महिलांना केले हे महत्वाचे आवाहन...

 
Vxhxj

बुलडाणा( जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिला आयोगातर्फे ‘महिला आयोग आपल्या दारी’चे आयोजन शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. यात महिलांनी स्वत: पुढाकार घेऊन तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकनकर यांनी केले आहे.

महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी 11 वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर तक्रारीची सुनावणी घेतील. जिल्हा ठिकाणी होणाऱ्या जनसुनावणीस अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन धैर्याने आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर दि. 13 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. महिलांना त्यांच्याच जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या विषयाच्या अनुषंगाने जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तसेच कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थिती राहतील.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत म्हणाल्या, राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या, तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी उपस्थित राहणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येणार आहे. यातून आपल्या समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे कार्य आयोग करीत आहे.