कोलवड येथे महिला बचतगट कर्ज वाटप मेळावा ; संदीप शेळके म्हणाले, युनियन बँकेचे महिला बचतगटांसाठीचे कार्य कौतुकास्पद!

 
वेध
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांनी राज्यातील बाजारपेठ काबीज करुन स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. समाजाने या उद्योगी महिलांना सातत्याने पाठबळ दिले पाहिजे. युनियन बँकेने कर्ज वाटपात नेहमीच पुढाकार घेतला असून महिला बचतगटांसाठीचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले. 
तालुक्यातील कोलवड येथे १९ जून रोजी युनियन बँकेच्यावतीने महिला बचतगटांना कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर युनियन बँकेचे अमरावती विभाग क्षेत्र प्रमुख पऱ्हाटे, कृषी कारभार विभाग प्रमुख प्रशांत काळे, माजी सरपंच कौतिकराव पाटील, सरपंच मीराताई पवार, शाखा व्यवस्थापक रवींद्र चोपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, बचतगटांच्या महिला मेहनती असतात. एखादे काम हाती घेतले म्हणजे ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. महिलांना बचतीची नैसर्गिक देणगी मिळालेली आहे. व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना या गोष्टीचा निश्चितच लाभ होतो. बचतगटांच्या माध्यमातून व्यवसाय निवडीपासून ते व्यवसाय उभारणीपर्यंतचा कारभार महिला उत्तमरित्या सांभाळत आहेत. ही अभिमानास्पद बाब असून राजर्षी शाहू परिवार महिला बचतगटांच्या पाठीशी असल्याची ग्वाही संदीप शेळके यांनी यावेळी दिली.