महिला पोलिस अधिकारी प्रियंका गोरेंचे होतेय कौतुक! राहुल बोंद्रेना पोलीस ठाण्याच्या गेटवरच अडवले होते; म्हणाल्या, तुम्ही मला माझे काम करू द्या;

तुम्हाला इथून जाऊ देणार नाहीच..! नेटकरी म्हणतात, मॅडम सैल्युट...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना आत्मदहन आंदोलनादरम्यान काल, १२ फेब्रुवारीला पोलिसांनी ताब्यात घेत बुलडाणा शहर  पोलिस ठाण्यात आणले. दुपारी झालेल्या लाठीचार्ज मुळे आंदोलन आधीच चिघळले होते. त्यामुळे बुलडाणा शहर पोलिस ठाण्याला सुद्धा कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांशिवाय बाहेरच्या कुणालाच पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश देण्यात येत नव्हता. पोलीस ठाण्याचे मुख्य प्रवेशद्वार सांभाळण्याची  जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे यांच्याकडे होती. एपीआय गोरे यांनी ती जबाबदारी चोखपणे पार पाडली. रविकांत तुपकर यांना भेटायला आलेल्या अनेक राजकीय नेत्यांनी पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला, एपीआय गोरे यांच्याशी बाचाबाची सुद्धा केली...मात्र तरीही महिला पोलिस अधिकारी एपीआय गोरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आदेश आल्याशिवाय कुणालाच आत जाऊ दिले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या एपीआय गोरे यांची चांगलीच चर्चा आहे. मॅडम तुमच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम असे म्हणत नेटकरी गोरे यांचे कौतुक करीत आहेत.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे काल, संध्याकाळी ७ च्या सुमारास बुलडाणा शहर पोलिस ठाण्यासमोर आले. त्यांनी पोलीस ठाण्यात जाण्याचा प्रयत्न केला, मात्र एपीआय गोरे यांनी राहुल बोंद्रे यांना पोलीस ठाण्यात जाण्यापासून रोखले. यावेळी बोंद्रे चांगलेच संतापले, मला पोलीस ठाण्यात जाण्यापासून तुम्ही कसे रोखू शकता?  हे तुमचे बरोबर नाही, तुमची हुकूमशाही सुरू आहे..मी आत जाणारच, हवे तर मला अटक करा, माझ्यावर गुन्हा दाखल करा असा युक्तिवाद बोंद्रे यांनी केला.

एकवेळ तर बोंद्रे यांनी आत जाण्याचा प्रयत्नही करून बघितला मात्र मी तुम्हाला आत जाऊ देणार नाहीच अशी भूमिका एपीआय गोरे यांनी घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश लोधी हेसुद्धा यावेळी   पोलीस ठाण्यासमोर गेटवर होते. यावेळी राहुल बोंद्रे यांनी पोलिसांच्या भूमिकेचा निषेध केला, मात्र एपीआय गोरे यांनी सयंम ठेवून परिस्थिती हाताळली. मला वरिष्ठांचे आदेश आहेत, त्यामुळे मी तुम्हाला आत जाऊ देणार नाहीच अशी भूमिका एपीआय गोरे घेत होत्या.

अखेर शेवटी राहुल बोंद्रे यांना पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करावे लागले.  सध्या महिला पोलीस अधिकारी एपीआय गोरे आणि राहुल बोंद्रे यांच्या पोलिस ठाण्याबाहेरील चर्चेचे व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी एपीआय गोरे यांच्या धाडसाचे, भूमिकेचे कौतुक करीत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कुणाला आत न सोडण्याची घेतलेली भूमिका चूक की बरोबर ते बाजूला ठेवा मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे पालन कसे करायचे असते.. कर्तव्यनिष्ठा यालाच म्हणतात, मैडम सैल्युट...अशा शब्दात नेटकरी एपीआय गोरे यांचे कौतुक करीत आहेत..!