चिखली विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेनेला सुटणार? संजय राऊतांकडे कपिल खेडेकरांची मागणी...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुका तोंडावर आले असल्याने नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची शेगावात बैठक घेतली. या निवडक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या मतदार संघातून शिवसेनेला निवडणूक लढता येईल यावर चर्चा झाली. यावेळी उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांच्यासह चिखलीच्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्याकडे चिखली विधानसभा मतदारसंघ शिवसेना उबाठा साठी सोडवून घेण्याची मागणी केली.
  Advt
Advt.👆
लोकसभेच्या निवडणुकीत चिखली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना चांगले मताधिक्य मिळाले. चिखली विधानसभेत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी पक्की आहे. अलीकडच्या काळात उद्धव ठाकरेंच्या दोन सभा चिखलीत झाल्या असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक उबाठा शिवसेना १०० टक्के जिंकेल असा विश्वास उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी संजय राऊत यांच्याजवळ बोलतांना व्यक्त केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चिखली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घ्या असा आग्रह कपिल खेडेकर यांनी धरला. यावेळी चिखली विधानसभेतून कपिल खेडेकर यांच्यासह युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, तालुकाप्रमुख किसन धोंडगे, शहर प्रमुख श्रीराम झोरे, विष्णू मुरकुटे,गजानन पवार, संतोष वाकडे , अशोक सुरडकर, आनंद गैची हे पदाधिकारी उपस्थित होते.