पावसामुळे मतदानाची टक्केवारी घटणार ? बुलढाण्यात कोसळल्या पाऊस धारा, मतदान करण्यासाठी बाहेर पडा! "बुलडाणा लाइव्हचे" मतदारांना आवाहन!
Apr 26, 2024, 17:03 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा जिल्ह्याचे भवितव्य घडवण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज २६ एप्रिलच्या सकाळपासून बुलढाणा लोकसभा मतदार संघात मतदान सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ४१.६६ टक्के मतदान झाल्याचे माहिती बुलडाणा लाइव्हला मिळाली आहे. परंतु अगदी थोड्यावेळापूर्वी बुलडाणा शहरात पवासाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणचे बूथ केंद्रात एकच धावपळ सुरू झाली आहे. तर मतदान केंद्रांच्या ठिकाणीही कर्मचारी, मतदार वर्गांचे बेहाल झाल्याचे चित्र आहे. दुपारी तीन नंतर तसेच कडकडत्या उन्हानंतर अनेक जण मतदानासाठी बाहेर पडण्याच्या तयारीत होते, परंतु अचानक पाऊस सुरू झाल्याने मतदानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका आता उमेदवारांना बसणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. तरी बुलडाणा लाइव्ह समस्त वाचकांना आवाहन करत आहे की, जिल्ह्याच्या भवितव्यासाठी , भविष्य घडविण्यासाठी नागरिकांनी पावसाचा विचार न करता मतदानासाठी बाहेर पडावे.