POLITICAL SPECIAL पालकमंत्री पुन्हा बदलणार? घटस्थापनेनंतर डॉ. राजेंद्र शिंगणे यांची मंत्रिमंडळात पुनर्स्थापना होण्याची शक्यता..

 
jlkjdl
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकारणात अश्यक्य असं काहीच नसत..कधी काय होईल याचा नेम नाही.. आता बुलडाण्याचच पहा ना...दिलीप वळसे पाटील पालकमंत्री होतील असं कुणाला वाटल होत? पण मुख्यमंत्री कार्यालयात  निर्णय झाला अन् गुलाबराव पाटलांचे पालकमंत्री पद काढून ती माळ दिलीप वळसे पाटलांच्या गळ्यात टाकण्यात आली..पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सहकारमंत्री म्हणून वळसे पाटील जिल्ह्यात येणारच होते,मात्र एकाएकी झालेल्या या निर्णयाने दुसऱ्याच दिवशी ते पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात आले. रातोरात दिलीप वळसे पाटलांच्या स्वागतासाठी बॅनर लागले..दिलीप वळसे पाटलांना पालकमंत्री करतांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीसांनी खा. प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाडांच्या विरोधाला काही किंमत दिली नाही. "काही झाले तरी राष्ट्रवादीचा पालकमंत्री होऊ देणार नाही" हे आमदार संजय गायकवाडांचे शब्द हवेतच विरले..आता पुन्हा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील जिल्ह्यातील शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांसाठी धक्कादायक राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे.
 

अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी होऊन १०० दिवस झाले आहेत. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे या निवडणुकीवर परिणामकारक ठरतील असे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली घेण्यात येतील. त्यात अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चु आणि काहींना मंत्रिमंडळात नव्याने स्थान देण्याचा प्लॅन असल्याचे सूत्रांनी सांगितले.याच धोरणानुसार बुलडाणा  जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले, मात्र मंत्रिमंडळात काम करण्याचा मोठा अनुभव असलेले डॉ.राजेंद्र शिंगणे यांची मंत्रिमंडळात पुनर्स्थापना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत. घटस्थापना किंवा त्यानंतरच्या काही दिवसांत होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. राजेंद्र शिंगणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.

  पुन्हा पालकमंत्री...

डॉ. राजेंद्र शिंगणे यांची एकदा का मंत्रिमंडळात वर्णी लागली की बुलडाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ पुन्हा त्यांच्या गळ्यात पडेल हे जवळपास नक्की आहे. सध्याही दिलीप वळसे पाटलांच्या पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या धोरणात्मक विकासाची दोर आपली हाती मिळवण्यात आ. डॉ.शिंगणे कमालीचे यशस्वी ठरले आहेत. दोन दिवसांपूर्वी बुलडाणा शहरात झालेल्या एका कार्यक्रमात आमदार डॉ.शिंगणे यांनी आ.संजय गायकवाडांचे तोंड भरून कौतुक केले होते...झालं गेलं विसरा,आता आपल्याला सोबतच काम करायचय असंच डॉ.शिंगणे आमदार गायकवाडांना सांगत असावेत.....