नरेंद्र खेडेकर तुल्यबळ लढत देतील काय? राजकीय वर्तुळात संमिश्र चर्चा..

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगावीचा राणा गजानन महाराजांचा वार म्हणजे गुरुवार! जिल्ह्यातील लाखो भक्तांसाठी हा शुभ दिन, उपवासाचा दिवस, श्रीं च्यापूजा अर्चनेचा दिवस. याच दिवशी महाराजांचे भक्त असलेले नरेंद्र खेडेकर यांच्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवारीचे सूतोवाच झाले. यामुळे 'रायगड' (खेडेकरांचे निवासस्थान) आनंदाने न्हाऊन निघाले आहे. त्यांचे जुने नवे चाहते, शिवराणा मंडळ आनंदित झाले आहे.
  अर्थात यात काही गैर नाही, खुशखबर म्हणजे आनंद, सेलिब्रेशन ओघाने आले, ते स्वाभाविकच ठरते. मात्र राजकारण करणाऱ्यांचा आनंद भोळा भाबडा नसावा,हे तेवढेच खरे. महा नगरीतील 'मातोश्री'वर झालेल्या बुलडाणा मतदारसंघावरील खलबतीत, नरेंद्र खेडेकर यांचे नाव उमेदवारी साठी सुचविण्यात आले. ते एकमताने सुचविण्यात आले, अविरोध मांडण्यात आले हे खरे, पण इतर उपस्थित पैकी कुणीच म्हणजे एकही सरदार, शिलेदार, मावळा इच्छुक नव्हता. म्हणून खेडेकर गोटात आनंदाचे भरते येणे स्वाभाविकच! मात्र उमेदवारीसाठी नाव सुचविण्यात येणे म्हणजे तिकीट पक्के असे नव्हे याचे भान आनंदोत्सव पाळताना ठेवणे आवश्यक व अपेक्षित ठरते. नेमके येथेच गफलत झाली. नाव सुचवीणे म्हणजे उमेदवारी फायनल, अंतिम शिक्कामोर्तब असा त्याचा राजकीय अर्थ तर होत नाही. चिखली विधानसभेसाठी त्यांच्या नावाची हवा गरमा गरम असताना ऐनवेळी नरुभाऊंचा 'चान्स' हुकला होता. काही वर्षांपूर्वी चांगले, स्वच्छ राजकारण असतानाच्या काळात असे झाले तर आजकालच्या गढूळ, चिखलमय झालेल्या राजकारणात तर काहीही होऊ शकते...
   
उत्साह आणि वास्तव
 आता समजा उबाठा ची उमेदवारी नक्की झाली तरी काँग्रेस ते इतक्या सहजासहजी घेईल का? हा प्रश्न आहे. खेडकरांचे नाव समोर आल्यावर चिंतेत असलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांच्या गोटात देखील आनंदाचे वातावरण आहे म्हणे ? याचे उत्तर म्हणजे त्यांच्यासाठी खेडेकरांची उमेदवारी म्हणजे विजयाची संधी असल्याचे ते मानतात. संपर्क, विकासकामे, धनशक्ती, अनुभव, पाठबळ या सर्वच बाबतीत खासदार वरचढ आहेत असे म्हणणे फारसे चुकीचे ठरणारे नाही. शिंदे गट, भाजप अन अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचीही तीच प्रतिक्रिया आहे. बरं ते विरोधक आहे ,पण महाविकास आघाडीला पण खेडेकरांची उमेदवारी विजयाची 'गॅरंटी' देणारी वाटत नाही,हे तेवढेच खरे.. नरेंद्र खेडेकर हे प्रतापराव जाधव यांना तुल्यबळ लढत देऊ शकतील याबद्धल आघाडीतच नव्हे तर बहुसंख्य सामान्य मतदार ते जनता जनार्दनला देखील गॅरंटी नाही. कालपासून यासंदर्भात केलेल्या ' लाईव्ह' चर्चेत ही बाब समोर आली आहे. त्यामुळे ही लढत एकतर्फी ठरण्याची खात्री शिंदेशाही ला आहे तर आघाडीवीरांसाठी ही चिंतेत पाडणारी धास्ती आहे...