१३ तालुक्यांच्या बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक तालुका वाढणार? आ.डॉ राजेंद्र शिंगणेंनी केली "या" तालुकानिर्मितीची मागणी..

 
सिंदखेड राजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पुनर्रचना समिती गठीत करण्यात आली असून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या समितीमध्ये साखरखेर्डाचा देखील समावेश करावा, साखरखेर्डा नवीन तालुका निर्माण व्हावा, अशी मागणी लक्षवेधीच्या निमित्ताने आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.आ. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी या विषयाचा पाठपुरावा केल्यास १३ तालुक्यांच्या बुलडाणा जिल्ह्यात १४ वा तालुका निर्माण होऊ शकतो..
हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली. यावेळी आ. शिंगणे यांनी "साखरखेर्डा हा तालुका व्हावा याकरिता १९९२ पासून मागणी आहे. १९९५ मध्ये युती सरकार असताना अनेक छोट्या तालुक्यांची निर्मिती झाली, त्यावेळेस सुद्धा साखरखेर्डाचे नाव यादीमध्ये होते. परंतु, काही कारणास्तव ते होऊ शकला नाही. १९६५ साली साखरखेर्डा पंचायत समितीचे केंद्र म्हणून सुद्धा निवड झाली होती, त्याचा उद्घाटन सोहळा देखील पार पडला होता. परंतु, तो नंतर रद्द झाला. सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तहसील व इतर कार्यालयांच्या दृष्टीने लागणारे या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच साखरखेर्डा या गावाला ऐतिहासिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. साखरखेर्डा व त्यालगतच्या साधारण ९६ गावांना सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, मेहकर, चिखली पंचायत समितीमध्ये वाटण्यात आलेले आहेत. म्हणून या गावातील जनतेला ७० ते ८० किलोमीटर अंतरावर दररोज तहसील व इतर शासकीय कामासाठी जावे लागते" असा विषय मांडला..
 साखरखेर्डा तालुका व्हावा ही जुनी मागणी मान्य करून विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पुनर्रचना समिती गठीत करण्यात आलेली आहे, या समितीला मुदत वाढ सुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणूनच या समितीमध्ये साखरखेर्डाचा देखील समावेश करावा, अशी मागणी या लक्षवेधीच्या निमित्ताने आ.डॉ. शिंगणे यांनी केली. यावर मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक उत्तर देत नक्कीच सर्व निकष बघून तसेच मागणीचा विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.