महायुतीचा घटक असुनही शिंदेंची शिवसेना आ. डॉ.राजेंद्र शिंगणेंच्या एवढी मागे का लागली? युवासेना उपजिल्हाप्रमुखांनी डॉ.राजेंद्र शिंगणेंवर केलेत गंभीर आरोप; वाचा नेमके मॅटर आहे तरी काय...
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी महायुतीचा भाग आहे. दोन लोकसभा निवडणुका खा. प्रतापराव जाधव यांच्या विरोधात लढलेले डॉ.राजेंद्र शिंगणे यंदा प्रतापराव जाधवांच्या विजयासाठी जीवाचे रान करतांना दिसले. प्रतापराव जाधव केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांच्या सिंदखेडराजा येथील नागरी सत्काराच्या आयोजनासाठी डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसले. मात्र एवढे असूनही शिंदेगटाची शिवसेना डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर काही खुश दिसत नाही..नव्हे नव्हे तर लवकरात लवकर डॉ.राजेंद्र शिंगणेंनी शरद पवार गटाची वाट धरून महाविकास आघाडीत जावे अशी सिंदखेडराजा मतदारसंघातील शिंदेच्या शिवसेनेतील काहींची इच्छा आहे.अर्थात त्याला कारणही तसेच आहे.
डॉ.राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तरच शिंदेगटाच्या शिवसेना नेत्यांना विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावता येईल, अन्यथा चांगलीच घोर- निराशा होऊ शकते. त्यामुळेच की काय वरवर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसत असली तरी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात मात्र चांगलीच अंतर्गत धुसफूस सुरू आहे. शिंदे गटातील शिवसेनेचे काही पदाधिकारी उघड उघड डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर आरोप करून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे..अर्थात याला कुण्या तरी महत्त्वाकांक्षी नेत्याची फुस असेल अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.